विधान परिषदेचे आश्वासन; निवडणुकीत उमेदवारांची मांदियाळी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.

विधान परिषदेचे आश्वासन; निवडणुकीत उमेदवारांची मांदियाळी?

चिपळूण : उत्तर रत्नागिरी भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला जात आहे. काहींना विधान परिषदेचे आश्वासन दिले जात आहेत. तर काहींना विकास कामे करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील जुने कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याचा काही भाग गुहागर खेड दापोली आणि मंडणगड तालुके रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. रायगड लोकसभा मतदार संघात शेकापची मते निर्णायक मानली जातात. शेकापने सहकार्य केले नाही. तरी रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, यासाठी तटकरे यांची बांधणी सुरू आहे. त्यासाठी प्रादेशिक पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला जात आहे.

रत्नागिरी आणि रायगड या दोन मतदार संघात कुणबी समाजाची मते निर्णायक मानली जातात. कुणबी भवन उभारण्यासाठी राष्ट्रवादीच्या मध्यमातून चार कोटीची मदत मिळवून देण्यात तटकरे यांचे योगदान आहे. आता कुणबी समाजातील नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला जात आहे. हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी फायदेशीर असले तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. कालपर्यंत जे पक्षासाठी काम करत होते. त्यांना बाजूला करून नव्याने आलेल्या लोकांना उमेदवारी दिली तर पक्षातच बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

उत्तर रत्नागिरी भागात राष्ट्रवादीची पूर्ण मदार दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्यावर आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विश्वासात घेतले नाही, अशी कदम यांची खंत आहे. जिल्ह्याकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. संपर्कमंत्री जिल्ह्यात फिरत नाहीत. विकास कामांसाठी निधी मिळत नाही, अशी व्यथा कदम यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली होती. पक्ष वाढत असला तरी अंतर्गत स्पर्धा आणि नाराजी जोरात वाढत आहे.

ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्याबद्दल शिवसेनेकडून कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नाहीत. माजी मंत्री अनंत गीते यांचे समर्थक शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. गीते यांनीही फारशी दखल घेतली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांनी ठरवले तर राष्ट्रवादीत आलेल्या शिवसैनिकांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो तशा हालचाली सध्या सुरू आहेत.

"ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांची दखल घेणे एवढे ते मोठे नाहीत. शिवसेना पक्ष मोठा आहे. भविष्यात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असेल."

- अनंत गीते, माजी खासदार

loading image
go to top