esakal | शेतकरी, महिलांना शेतीची कास; 'समिक्षां'चा प्रेरणादायी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

mandangad

शेतकरी, महिलांना शेतीची कास; 'समिक्षां'चा प्रेरणादायी प्रवास

sakal_logo
By
सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक प्रगत तंत्रज्ञान अवगत व्हावे, त्यातून कृषी विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने स्वतः शेतीची कास धरणाऱ्या कुंबळे येथील समिक्षा संदेश लोखंडे या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. हळद, काजू, नारळ, संकरित मिरची लागवडीसह डेमो प्लॉटमधून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाची दिशा ठरल्या आहेत. यासाठी त्यांना पंचायत समिती कृषी विभागाने सहकार्य केले आहे.

रोपवाटिका सुरू करण्यापूर्वी जागा, पाणी नियोजनाची पाहणी केली. मंडणगडचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कुंबळे येथील शेतावर या १० फूट व्यास व ५ फूट उंचीची सुमारे १० हजार लिटर पावसाचे पाणी साठणारी टाकी बांधण्यात आली. या टाकीचे बांधकाम स्थानिक गवंडी सुरेश पवार यांच्या मदतीने केले. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने कुंबळेच्या कार्यक्षेत्रात प्रथमच 'रेन वॉटर हार्व्हेस्टिंग टॅंक' बांधण्यात आली असून यासाठी जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबईने पुढाकार घेतला.

सहसा पावसाळ्यात संकरित मिरची लागवड केली जात नाही, पण प्रयोग म्हणून सितारा संकरित बियाण्यांची रोपं गादीवाफयावर तयार केली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावली. सेंद्रिय खत, रासायनिक खत, कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या, पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर योग्य पद्धतीने केला आहे. दिवसभरात दुपारपर्यंत शिवणक्लास वर्ग आणि त्यानंतर शेतात असा दिनक्रम असणाऱ्या समिक्षा यांचा प्रवास कष्टमय आहे. यामध्ये त्यांना पती संदेश यांची मोलाची साथ मिळाली आहे.

कौतुकाची थाप

समिक्षा यांनी यावर्षी स्वतः आधी कृतिशील लागवड केली. यात १० गुंठे क्षेत्रावर हळद लागवड, १०० काजू व ५० नारळ रोपांची लागवडही मनरेगामधून केली. संकरित मिरची लागवड प्रात्यक्षिक केले आहे. कृषीच्या भविष्यकालीन वाटचालीत महत्वपूर्ण ठरणाऱ्या या क्षेत्राला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, सीईओ इंदुराणी जाखड, जलवर्धिनीचे उल्हास परांजपे, विद्यापीठाचे कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी यांनी भेटी देत कौतुकाची थाप दिली.

महिलांना स्वयंरोजगाराची वाट

ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी २००८ पासून शिवणक्लास वर्ग चालवले. कुंबळे ग्रामपंचायतीचे अडीच वर्षे सरपंच, १० वर्षे सदस्यपद सांभाळत गावविकासाला गती दिली. महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे व उपक्रम राबवत सज्ञान केले. आता शेतीविषयक मार्गदर्शने करून कृषिक्षेत्रात आर्थिक फायदा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा: रत्नागिरी विमानतळ उड्डाणासाठी तयार ;उदय सामंत

कृषीची ५ एकर क्षेत्रावर हळद लागवड

नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी हळद रोपांच्या निर्मितीसाठी रोपवाटिका निर्मिती करून हळकुंडापासून एसके ४ स्पेशल कोकण जातीची ५० हजार रोपांची निर्मिती केली. त्यातून तालुक्यात पंचायत समिती कृषी विभागाने ५ एकर क्षेत्रावर हळद लागवडीचा उपक्रम राबवला. एक गुंठा क्षेत्रावर डेमो प्लॉट तयार करून हळकुंडापासून तयार केलेले रोप, दोन रांगेतील अंतर, रोपांतील अंतर, जमीत तयार करणे, खत व्यवस्थापन, लागवडीवेळी घालावयाची सेंद्रिय खते, रासायनिक खते, हळद बियाण्यांना कीटकनाशक बुरशीनाशकाची प्रक्रिया, पाणी व्यवस्थान, पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक या बाबी प्रत्यक्ष दाखवण्यात आल्या.

एक नजर

  1. २००८ पासून चालवले शिवणक्लास वर्ग

  2. कुंबळे ग्रामपंचायतीचे अडीच वर्षे सरपंच

  3. १० वर्षे सांभाळले सदस्यपद

  4. पावसाळ्यात संकरित सितारा मिरची लागवड

  5. १० गुंठे क्षेत्रावर केली हळद लागवड

  6. १०० काजू व ५० नारळ रोपांची लागवडही

  7. हळद रोपांच्या निर्मितीसाठी रोपवाटिका निर्मिती

  8. कोकण जातीची ५० हजार रोपे तयार

loading image
go to top