बेळणेमध्ये शेतघर पेटवले : जमिनीच्या वादातून प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळणेमध्ये शेतघर पेटवले

बेळणेमध्ये शेतघर पेटवले : जमिनीच्या वादातून प्रकार

कणकवली : तालुक्यातील बेळणे खुर्द सतीचा माळ येथील महिलेचे शेतघर अज्ञाताने पेटवले. हा प्रकार शनिवारी (ता. २०) रात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंदविण्यात आला. हा वाद जमीन खरेदीच्या व्यवहारातून घडल्या असावा, असा प्राथमिक अंदाज आहे; मात्र याबाबत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : फिर्यादी देवदास बाबूराव कारंडे (वय ३० रा. बेळणेखुर्द) यांची आई सखूबाई या १९९३ पासून या शेतघराच्या एका मांगराच्या खोलीमध्ये राहत होत्या. सखूबाईंसोबत त्यांचा मुलगा आणि नातेवाईक होते. काही वर्षापूर्वी मुंबई येथील एकाने ही जागा खरेदी केली. त्या जागेत १९९९ च्या दरम्याने खासगी कंपनी सुरू केली होती. काही काळ कंपनी सुरू असताना सखूबाई तेथे राहत होत्या. संबंधितांनी त्यांना देखरेखीसाठी त्याच शेत घरांमध्ये राहण्यासाठी सांगितले होते. कंपनी २००४ नंतर बंद पडली. त्यावेळेपासून संबंधित आणि सखूबाई यांच्यात पगारावरून वाद आहेत.

हेही वाचा: बारामतीचा अभिषेक ठरला देशातील पहिला युवा आयर्नमॅन....

त्यामुळे सखूबाई खोलीतच राहत होत्या. घरकाम आणि इतर देखरेखीबाबत ठरलेल्या पगाराची रक्कम न मिळाल्याने सखूबाई यांनी मुंबईतील न्यायालयात दावा दाखल केला होता. या जमिनीतील शेतमांगर हा सखूबाई यांच्याच नावावर होता. त्यामुळे त्या नातेवाईकांसह तेथेच राहत असत. शेतमांगराच्या जागेबाबत गेले काही वर्षे दावा सुरू आहे.

दरम्यान, सखूबाई यांनी बेळणे येथे महामार्गालगत एक हॉटेल सुरू केले आहे. तेथे शनिवारी रात्री सखूबाई आणि त्यांची मुले वस्तीला होते. सतीचा मळा येथील शेत घर बंद होते. ही संधी साधून अज्ञाताने त्यांचे शेतघर पेटवून दिले. त्यात सखूबाईंची सर्व कागदपत्रे तसेच सोन्याची एक माळही जळून खाक झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी सखूबाई यांचा मुलगा देवदास यांनी फिर्याद दिली. कणकवली पोलिस उपनिरीक्षक जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

loading image
go to top