खेकडे पकडताना शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

ओढ्यावरून "महावितरण'ची 11 केव्हीची विद्युतवाहिनी गेली आहे.

राजापूर- विजेची 11 केव्ही क्षमतेची विद्युतभरीत वाहिनी खेकडे पकडत असलेल्या ओढ्यात पडल्याने त्याचा शॉक लागून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. दिवाकर विश्राम पुजारी (वय 42) आणि अथर्व पुजारी (10) अशी त्यांची नावेआहेत. ही घटना काल (ता. 2) सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना तालुक्‍यातील नाणार येथे घडली. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवाकर पुजारी हे नाणार ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते; तर अथर्व हा चौथीत शिकत होता. 

काल सायंकाळी सातच्या सुमारास नाणारमधील दिवाकर पुजारी हे मुलगा अथर्व याच्यासह गावातीलच ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. या ओढ्यावरून "महावितरण'ची 11 केव्हीची विद्युतवाहिनी गेली आहे. सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात या वाहिनीचे कंडक्‍टर तुटल्याने विद्युतभारीत वाहिनी ओढ्यात कोसळली. या दरम्यान हे दोघे पिता-पुत्र खेकडे पकडण्यासाठी ओढ्यात उतरले होते. त्यात त्यांना शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण विभागाला सांगून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. नाणारचे सरपंच ओंकार प्रभुदेसाई, उल्हास प्रभुदेसाई, मजिद भाटकर, राजेंद्र पुजारी, दत्ताराम साखरकर, प्रभाकर पुजारी यांच्यासह नाणार गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या दुर्घटनेनंतर महावितरणचे अधिकारी चिन्मय चिवटे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप काळे हेही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला. ग्रामस्थांनी मृतांच्या वारसांना "महावितरण'कडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे व तसे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. 

हे पण वाचा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर सेवक होऊन लढणार ; खासदार संभाजीराजे छत्रपती 

 

 "महावितरण' करणार आठ लाख रुपयांची मदत 
"महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर याची दखल घेत "महावितरण'चे कार्यकारी अभियंता बेले यांनी या घटनेची दखल घेत "महावितरण'कडून नियमाप्रमाणे मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची ग्वाही देत लेखी पत्र दिले. अंत्यसंस्कारासाठी 40 हजार रुपयांची तातडीची मदतही दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son died of shock in ratnagiri