आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर सेवक होऊन लढणार ; खासदार संभाजीराजे छत्रपती 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जाताना पाटगाव येथून संत मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन गेले व ती मोहीम फत्ते करून आले.

कडगाव - मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून अखेरपर्यंत लढण्याची ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पाटगाव (ता. भुदरगड) येथे भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित संघर्ष यात्रेच्या प्रारंप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी सभापती धनाजीराव देसाई, मठाधिपती संजय बेनाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खासदार संभाजीराजे म्हणाले, ""छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, ताराराणी, शाहू महाराज यांच्या विचारांचा पाईक असून मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी समाजाने एकसंधपणे लढा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जाताना पाटगाव येथून संत मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन गेले व ती मोहीम फत्ते करून आले. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी आपण मौनी मठातून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाईदेखील निश्‍चित जिंकू.'' 

ते म्हणाले, ""मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत योग्य पणाने लावून धरू. याकरिता सर्वच राजकीय पक्षातील मराठी नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.'' 
मराठा समाजाच्या वतीने पाटगाव ते आदमापूर अशी संघर्ष रॅलीचे आयोजन केले होते. त्याबद्दल संभाजीराजे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचे आवाहन तरुण कार्यकर्त्यांना केले. युवकांनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रॅली रद्द केली. 
सचिन सचिन भांदिगरे, किरण आबिटकर, ऋतुजा गुरव, प्राची सुतार, यांनी मनोगते व्यक्त केले. स्वागत सचिन डेळेकर यांनी केले. सत्यजित जाधव, राहुल देसाई, बाबा नांदेकर, संदेश भोपळे, नंदकुमार शिंदे, विश्वनाथ कुंभार, मच्छिंद्र मुगडे, शशिकांत पाटील प्रवीणसिंह सावंत, अर्जुन आबिटकर, विश्वजित जाधव, संदीप वरंडेकर, नंदकुमार ठाकूर, महेश पिळणकर प्रमुख उपस्थित होते. 

हे पण वाचा - ...अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयांना टाळा ठोकण्यात येईल

 

गावागावात भगवा 
गारगोटी, कडगाव, पाटगाव आदी प्रमुख गावे भगवेमय झाली होती. एक मराठा-लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

मुस्लिम समाजाचा पाठिंबा 
बहुसंख्याक मुस्लिम असणाऱ्या अनफ खुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. ग्रामस्थांनी खासदार संभाजीराजे यांचा सत्कार केला. यात्रेत सहभागी तरुणांना पाण्याचे वाटप केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji raje chatrapati speech on maratha reservation