गुहागरमध्ये कोरोना पाठोपाठ आता शाईची भिती...

मयूरेश पाटणकर
बुधवार, 20 मे 2020

विलगीकरणाचे शिक्के मारलेल्या तालुक्यातील शेकडो  ग्रामस्थांच्या हातावर ॲलर्जीचे फोड आले आहेत.

गुहागर (रत्नागिरी) : विलगीकरणाचे शिक्के मारलेल्या तालुक्यातील शेकडो  ग्रामस्थांच्या हातावर ॲलर्जीचे फोड आले आहेत. कोरोनाच्या संकटातच ही ॲलर्जी आल्याने अनेक अफवाही पसरु लागल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोऱ्या फाटा तपासणी केंद्रावरील शाई जुनी असल्याने आरोग्य विभागाने बदलली आहे. मात्र तहसीलदारांनी मागणी करुनही जिल्हा प्रशासनाने वेळेवर नव्या शाईचा पुरवठा केल्या नसल्याचे समोर आले आहे.

गेल्या चार दिवसांत परगावातून शेकडो ग्रामस्थ तालुक्यात आले. मार्गताम्हाने बोऱ्या फाटा येथील तपासणी केंद्रावर या ग्रामस्थांची माहिती घेवून संस्थात्मक किंवा गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येत आहेत. हे शिक्के सहज पुसले जावू नयेत म्हणून निवडणुकीच्या काळात बोटाला लावायची शाई वापरण्यात येत आहे. ही शाई जुनी असल्याने शेकडो ग्रामस्थांच्या हातावर शिक्का मारलेल्या ठिकाणी फोड आले आहेत. काही जणांच्या हाताला खाज सुटत आहे. तर काहीजणांना शाई लागलेल्या ठिकाणी आग होत आहे. १९ तारखेला दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोतळुक, शीर, चिंद्रावळे, गुहागर, उमराठ, काळसुर कौंढर या गावातील लोकांना शाईच्या ॲलर्जीचा त्रास होवू लागला आहे.

हेही वाचा- लक्षणे असणाऱ्यांचाच स्वॅब घेणार

 प्रशासनाने शाई बदलली

या संदर्भात तहसीलदार सौ. लता धोत्रे म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनाकडे तपासणी केंद्र सुरु करतानाच नव्या शाईच्या १५० बाटल्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केले. गेल्या तीन दिवसांत तालुक्यात येण्याऱ्यांची संख्या वाढल्याने आमच्याकडे उपलब्ध असलेली शाई आम्ही तपासणी केंद्रावर दिली. सदर शाईची ॲलर्जी येत असल्याने नवी शाई तातडीने मागवून आरोग्य विभागाकडे दिली आहे.

हेही वाचा - कोगे येथे भोगावती नदीमध्ये चारचाकी कोसळली.... -

ॲलजीवरील उपचारासंदर्भात तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. चरके म्हणाले की, ॲलर्जीवर उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना दिल्या आहेत. ॲलर्जी आलेल्या रुग्णांना घरपोच औषध वितरण गावपातळीवरील आरोग्य कर्मचारी व आशा सेविका करणार आहेत.

दरम्यान शासनाने वापरलेल्या शाईमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी ॲलर्जी आलेल्या रुग्णाची तपासणी करुनच औषध द्यावे. अतिरिक्त औषधांची आवश्यकता असल्यास आरोग्य विभागाने त्याचा पुरवठा करावा. अशी मागणी गुहागर तालुका भाजपने आज तहसीलदार सौ. लता धोत्रे यांच्याकडे केली आहे.यावेळी गुहागर तालुका भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा पदाधिकारी श्रीकांत महाजन, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले , नगरसेवक समीर घाणेकर, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे,  संजय मालप उपस्थित होते

हेही वाचा -कोरोनाची धास्ती : जिल्ह्यात दस्तनोंदणीला 30 टक्के प्रतिसाद -

अफवांना उत, तालुक्यात भितीचे वातावरण

एकाच शिक्क्याचा आणि स्टॅम्प पॅडचा वापर केल्याने ही ॲलजी कोरोनाची तर झाली नाही ना. डॉक्टर उपचारासाठी टाळाटाळ करत आहेत. अशा अफवा पसरल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सदर ॲलर्जी जुन्या शाई असून शिक्का मारल्याने कोरोना होत नाही. लोकांनी अफवांवर विश्र्वास ठेवू नये. असे आवाहन तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of ink following Corona