esakal | मोजक्‍याच मच्छीमारांनी साधला मुहूर्त; सापडले `हे` मासे 
sakal

बोलून बातमी शोधा

Few Fishermen Starts Fishing In Ratnagiri Sea

शासनाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्याने मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत.

मोजक्‍याच मच्छीमारांनी साधला मुहूर्त; सापडले `हे` मासे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात आल्यावर पोषक वातावरणाचा फायदा काही मच्छीमारांनी घेतला. स्थानिक खलाशी उपलब्ध असलेलेच मच्छीमार समुद्रात रवाना झाले. मात्र, वातावरणाचा काही नेम नाही, या भीतीने गिलनेटने मासेमारी करणारे मच्छीमार 15 वावात जाऊन मासेमारी करण्याच्या मानसिकतेत नव्हते. या मुहूर्ताला बांगडा, चिंगुळ, सौदाळा अशी मासळी त्यांच्या जाळ्यात सापडली. 

शासनाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्याने मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदी कालावधी संपुष्टात आला असून, शनिवारी मुहूर्त साधण्याचा काहींचा मानस होता. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते. पर्ससिननेटद्वारे मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. मागील हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनामुळे मच्छीमारी हंगामाला फटका बसला होता.

सुमारे दीड महिना मासेमारी बंद होती. शिथिलता मिळाल्यावर मासेमारीला सुरवात झाली असली तरीही निर्यातीसह परराज्यांत मासे पाठविणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावरच त्यांना अवलंबून राहावे लागले. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. जून, जुलैमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मत्स्य हंगाम अडचणीत आला आहे.

ट्रॉलिंग मासेमारीसाठी बहुतांश मच्छीमार परराज्यांतील खलासी बोलावतात. बंदी सुरू होण्यापूर्वी ते खलाशी गावी परतले. त्यांना पुन्हा आणताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट होता. 

शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गानेही साथ दिलेली आहे; परंतु ईदमुळे मोजक्‍याच लोकांच्या नौका समुद्रात सोडल्या आहेत. यातही ट्रॉलिंग करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून, गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचा टक्‍का अधिक आहे. वरवडे येथील छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौदाळा यासारखी मासळी मिळाल्याचे समजते. 

15 वावाच्या पुढे मासळी असल्याने छोट्या मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे शक्‍य नाही. एखादे छोटे वादळ येऊन गेले तर ही मासळी किनाऱ्याकडे सरकेल. त्याचा फायदा छोट्या मच्छीमारांना होईल. 
- श्रीदत्त भुते, मच्छीमार