आजारी आईची चिंता स्वस्थ बसू देईना ; गोळ्या देण्यासाठी त्याने केला दोनशे किमीचा पायी प्रवास...

Finally a two hundred km trek to deliver the bullets
Finally a two hundred km trek to deliver the bullets

मंडणगड (रत्नागिरी) : गावाकडे असणाऱ्या आजारी आईच्या गोळ्या संपल्या. तिचा आजार बळावणार याची चिंता सतावू लागली. सर्वच पातळींवर प्रयत्न केल्यानंतरही त्या गोळ्या आईपर्यंत पोहच होत नसल्याने मातृप्रेमापोटी आशिष जोंधळे यांनी मित्र अनिल निकम याच्या सोबतीने सांताक्रूझ मुंबई ते उन्हवरे (ता.मंडणगड) असा अडीचशे किमीचा प्रवास पायी करण्याचा निश्चय करीत दोनशे किमीचा प्रवास केला. मंडणगड तालुक्याच्या म्हाप्रळ चेक पोस्टवर त्यांना प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेत कोरोन्टाईन करण्यात आले. मात्र अत्यावश्यक गोळ्या आईपर्यंत पोहचल्याने घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचे जोंधळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


  आशिष जोंधळे यांचे मंडणगड तालुक्यातील उन्हवरे हे गाव. कामानिमित्त ते मुंबईतील सांताक्रूझ परिसरात वास्तव्यास आहेत. २०१६ साली त्यांची आई वनिता जोंधळे हिला विविध व्याधी व मानसिक आजाराने त्रस्त केले. आजार बळावत गेला. अनेक ठिकाणी उपचार केले. दोन महिने अक्षरशः सर्व कुटुंब यापुढे हतबल झाले होते. अखेर मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी उपचार करून मागील चार वर्षांपासून तिची नियमित औषधे सुरू आहेत. ही औषधे फक्त मुंबईत उपलब्ध होत असल्याने मुंबईतून गावी पाठवून देणे किंवा स्वतः घेवून येत असत. ता.२२ मार्च रोजी अशाच प्रकारे गोळ्या घेवून येण्यासाठी आशिष यांनी एसटीचे आगाऊ आरक्षण केले होते.

मात्र त्याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर झाला. सर्वत्र कडक संचार बंदी लागू करण्यात आली. पुढे काही दिवस पुरतील एवढ्या गोळ्या आईकडे होत्या. पण त्याही मग संपल्या. तसेच लॉक डाऊनचा कालावधीही पुन्हा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला. गोळ्यांअभावी आईची तब्बेत पुन्हा बिघडू लागल्याची माहिती गावावरून फोनद्वारे कळू लागली. त्यामुळे गावी गोळ्या उपलब्ध आहेत का ही शोध मोहीम राबवली. तसेच मुंबईतून कोणी गावी जाणारे असल्यास व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून संदेश टाकून पाहिले. पोलीस स्टेशन गाठत परिस्थिती सांगितली, फोन करून चौकशी करा असे सांगितले, मात्र कुठेही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

आईच्या अनुभवलेल्या आजारामुळे चिंतेत वाढ आणि घेतला निर्णय
आईच्या गोळ्या पाठवून देण्यासाठी केलेले सर्वच प्रयत्न असफल ठरले. तिकडे आईची काळजी मनातून जाईना. या परिस्थितीत आईही फोनवर मी चांगली आहे तू काळजी करू नको असे सांगत असे. मात्र काही दिवसांनी आईची तब्बेत आणखी बिघडू लागली. पुन्हा गोळ्या पाठविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले मात्र प्रशासनास आधी येणाऱ्या खोट्या अनुभवामुळे कदाचित त्यांचा यावर विश्वास बसत न्हवता. आईच्या आजारपणात खूपच त्रासदायक अनुभव गाठीशी असल्याने चिंता वाढू लागली. शेवटी मनाशी पक्का निर्धार करून पायी चालत जाण्याचा निश्चय केला. गुरुवारी ता.२३ एप्रिल रोजी रात्री सांताक्रूझ येथून जोंधळे यांनी आपला मित्र अनिल निकम याच्यासोबतीने प्रवास सुरु केला.

प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव
रस्त्याला काहीच मिळणार नसल्याने सोबत  खाण्यासाठी बिस्किटे घेतली. पनवेल व पेण दरम्यान त्यांना अडविण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. वेळोवेळी सत्य परिस्थिती कथन केली मात्र त्यावर कुणाचाही लगेच विश्वास बसत न्हवता. त्यात बराच वेळही गेला. उगाचच कारणे सांगताय, मुंबईत कंटाळलात म्हणून आलात आणि बहाणा करताय असेही ऐकावे लागले. अनेक ठिकाणी बसून रहावे लागले. प्रशासनाची कर्तव्य दक्षता आणि मानवी मनाची ओलाईही अनुभवायला मिळाली. रात्री चालत राहणे आणि दुपारच्या कडक उन्हात कोठेतरी थांबणे असा प्रवास सुरु होता. डोळ्यांसमोर आईचा चेहरा असल्याने ते सर्व सहन करण्याची व त्यावर मात करण्याची शक्ती मिळत होती.

मंडणगडला पोहचताच केले कोरोन्टाईन; मात्र आईपर्यंत पोहचल्या गोळ्या
 मंडणगड तालुक्याच्या सीमेवर ता.२५ एप्रिल रोजी तीन दिवसांचा प्रवास करीत पोहचताच चेक पोस्टवर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेतले. यावेळी जोंधळे यांनी उन्हवरे गावचे पोलीस पाटील रमण दळवी यांना फोनद्वारे संपर्क केला. त्यांना घडला प्रकार सांगत आईच्या गोळ्या घेवून जावे असे सांगितले. त्यानंतर आशिष यांना मंडणगडमध्ये विलगिकरण कक्षात कोरोन्टाईन करण्यात आले आहे. ता.२६ एप्रिल रोजी सकाळी पोलीस पाटील दळवी यांनी तहसिल कार्यालय गाठले. परवानगी घेवून विलगिकरण कक्षात असणाऱ्या जोंधळे यांच्याकडून गोळ्या घेवून त्या त्यांच्या आईकडे सुपूर्त केल्या.


आईची काळजी स्वस्थ बसू देईना. खूप प्रयत्न केल्यानंतरही आवश्यक गोळ्या पोहच होत नसल्याने नाईलाज झाला. आईसाठी काय होईल तो त्रास सहन करायचा निश्चय करून निघालो. प्रवासात अनेकांचं खूप ऐकावं लागलं. मात्र आईकडे गोळ्या पोहचल्याचे समाधान जास्त आहे.
- आशिष जोंधळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com