दोडामार्ग बाजारपेठेचे लवकरच फायर ऑडिट

दोडामार्ग बाजारपेठेचे लवकरच फायर ऑडिट

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत दोडामार्ग बाजारपेठेचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी "सकाळ'ला दिली. दोन महिन्यात आगीच्या दोन घटना घडणे गंभीर बाब आहे. त्यामुळे फायर ऑडिट करणारी यंत्रणा आम्ही शोधत आहोत. अचानक आग लागून वित्त वा प्राणहानी होवू नये, याची खबरदारी यापुढच्या काळात घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

मुख्याधिकारी इंगळे पुढे म्हणाले, ""या दोन महिन्यात दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. तशा संभाव्य घटना कुठेही घडू शकतात. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जेथे आग लागण्याची शक्‍यता आहे असे स्पॉट शोधून उपाययोजनेच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत.''

श्री. इंगळे म्हणाले, ""बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानातील सर्व वायरिंगची तपासणी करुन घेण्याचे आणि शॉर्टसर्किटमुळे संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरपंचायतीला स्वतंत्र अग्निशामक बंब घेण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यासाठी सर्वसाधारण सभेची गरज भासल्यास लोकसभा आचारसंहिता संपल्यावर सभा घेवून तसा ठराव घेतला जाईल.''

सध्याची यंत्रणा अपुरी
सध्या नगरपंचायतीकडे पाच छोटे आग विझवण्याचे सिलिंडर आहेत. त्यांचा उपयोग अगदी किरकोळ स्वरूपाची आग असल्यास अथवा आगीची सुरवात असल्यास होऊ शकतो. मोठ्या घटनांचामध्ये ती यंत्रणा अपुरी अथवा कुचकामी ठरते. येथील बाजारपेठेत आग लागल्याचे कळताच ते अग्निशामक सिलिंडर आणण्यात आले होते; पण ते प्रभावहीन ठरले. त्यामुळे 4000 लिटर पाणी क्षमतेचा स्वतंत्र बंब नगरपंचायतीकडे असणे अत्यावश्‍यक बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com