रत्नागिरीकरांना भरपाईच्या पहिल्या टप्प्याचे साडेपाच कोटी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरू केला आहे.

ओरोस (रत्नागिरी) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मालवण तालुक्‍यातील तळगाव तलाठी सजाचे उद्‌घाटन आज सामंत यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार आमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नगेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा -  भरपाईचा पहिला हप्ता सिंधुदुर्गला प्राप्त ः सामंत -

झाराप येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण विभगाची जागा देण्यास ४८ तासांत मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणले, ‘‘शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात जानेवारीत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरू केला आहे. हे जनता दरबार तालुका स्तरावरही घेण्यात येणार आहेत. तळगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्‌घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे.

दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थांबून लोकांची कामे करतील. तलाठी यानी लोकांचा विश्‍वास संपादन करून चांगले काम करावे.’’ आदर्श खासदार कसे आसवेत, हे पाहण्यासाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘‘या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते यांचा वारसा लाभला आहे. तो वारसा  खासदार विनायक राऊत चालवत आहेत.

हेही वाचा -  दादागिरी करणाऱ्या पोलिसांनाच खेचले ठाण्यात -

आमदार वैभव नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत. या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही आमदार नाईक यांनी केले आहे.’’ तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी  मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार राऊत, आमदार नाईक यांचीही भाषणे झाली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first instalment of damage crop to farmers 5 crore received in ratnagiri said uday samant