मुंबई ते रत्नागिरी जलपर्यटन सेवेला प्रारंभ; मुंबईहून ४०० पर्यटक रत्नागिरीत (व्हिडिओ)

मुंबई ते रत्नागिरी जलपर्यटन सेवेला प्रारंभ; मुंबईहून ४०० पर्यटक रत्नागिरीत (व्हिडिओ)

रत्नागिरी - कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते रत्नागिरी जलपर्यटन सेवेला प्रारंभ झाला असून, महाराष्ट्रातील पहिली क्रूझ बोट जयगड येथील आंग्रे पोर्टवर दाखल झाली आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या सहकार्याने जलेश कंपनीची एम. एस. कर्णिका ही क्रूझ चालवली जात असून, 17 ऑक्‍टोबरला पुन्हा रत्नागिरीत येणार आहे. 

एम. एस. कर्णिका ही क्रूझ बुधवारी (ता. 9) रात्री मुंबईवरून निघाली होती. गुरुवारी (ता. 10) सकाळी आठ वाजता आंग्रे पोर्टला पोचली. सध्या ही बोट मुंबई ते आंग्रे पोर्ट अशी धावणार आहे. त्यातून आलेल्या सर्व प्रवाशांना गणपतीपुळे आणि मालगुंडचे दर्शन घडविण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रवासी बोट सायंकाळी 6 वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना होईल.

 


आंग्रे पोर्टवर आगमन झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी पर्यटकांचे स्वागत केले. या क्रूझचा प्रवास सतत सुरू राहावा, यासाठी प्रवासी आणि विशेष करून पर्यटकांचा प्रतिसाद अत्यावश्‍यक आहे. एम. एस. कर्णिका ही पंचतारांकित प्रवासी क्रूझ सतत सुरू राहील, या दृष्टीने प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या बोटीत पंचतारांकित सुविधा असून, पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. क्रूझ पर्यटनात सिंगापूर, दुबई, हॉंगकॉंग हे देश आघाडीवर आहेत. 

मुंबई - गोवा जलपर्यटन सुरू राहावे, यासाठी शासनाकडून गेले काही महिने प्रयत्न सुरू होता. पावसाळ्यापूर्वी त्याची चाचणी यशस्वीही झाली होती. पाऊस थांबल्यानंतर जलपर्यटनाला सुरवात झाली आहे. अशाप्रकारचे क्रूझ पर्यटन सिंगापूर, दुबई, हॉंगकॉंगमध्ये चालते. सिंगापूरमधील 20 टक्‍के पर्यटक भारतीय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटन क्षेत्रात भारताचा टक्‍का नगण्य आहे. सध्या भारतात 158 क्रूझ कार्यरत आहेत.

ही संख्या 700 पर्यंत वाढली तर रोजगार वाढणार आहेत. मुंबईत 300 कोटी खर्च करून 4.15 एकर जमिनीवर क्रूझ टर्मिनलच्या उभारणीला सुरवात झाली आहे. क्रूझ पर्यटनाचे मार्केटिंग जागतिक स्तरावर झाले तर त्याचा फायदा निश्‍चितच कोकणच्या पर्यटन व्यवसायाला होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू झाली असून, जानेवारी महिन्यात पुन्हा या ठिकाणी पर्यटकांना आणण्याचे आयोजन केले जाणार आहे. 

""महाराष्ट्रातील पहिले प्रीमियम क्रूझ कर्णिका हे जयगड बंदरात दाखल झाले. हे कोकणच्या पर्यटन विकासासाठी स्वागतार्ह आहे. दसऱ्याच्या निमित्ताने कर्णिकाने पश्‍चिम किनारपट्टीवर शुभारंभ करत सीमोल्लंघन केले.'' 
- विलास पाटणे,
रत्नागिरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com