एक जणाचा प्लाझ्मा देतो चार जणांना जीवनदान

राजेश कळंबटे
Monday, 19 October 2020

राज्यातील पहिले प्लाझ्मा थेरपीसाठीचे अफेरेसिस युनिट रत्नागिरी शासकीय रुग्णालयात सुरू झाले

रत्नागिरी : कोकणला लाटांचा सामना कसा करायचा, ते शिकवण्याची गरज नाही. पण, कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे, ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करून चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर कमी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

हेही वाचा - शिकारीस चाललेल्या सात तरुणांना अटक, तिघे फरार -

राज्यातील पहिले प्लाझ्मा थेरपीसाठीचे अफेरेसिस युनिट रत्नागिरी शासकीय रुग्णालयात सुरू झाले असून त्याच्या ऑनलाईन उद्‌घाटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईतून पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आदी सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना विरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आहे. त्यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम पर्याय आहे. याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. दुसरी लाट येऊ द्यायची नाही, यासाठी शपथ घ्या. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘प्लाझमा थेरेपी सुविधा केंद्रामुळे सगळे अहवाल एकाच ठिकाणी रुग्णांना मिळतील. कोरोनाबरोबर इतर आजारांचे अहवालही मिळूू शकतात. त्यासाठी खूप सरकारी खर्च व्हायचा, पण तो आता कमी होणार आहे. राज्यात मृत्युदर जास्त असणारे जे चार जिल्हे आहेत, त्यात रत्नागिरीचा समावेश आहे. या जिल्ह्यात मृत्यूदर कमी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे. 

हेही वाचा -  प्रस्तावित बांदा-संकेश्‍वर महामार्ग होणार तरी कसा?

मृत्यूदर एक टक्‍क्‍याखाली : सामंत

रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यासह माझ्या मतदारसंघात आता आकडा शुन्यावर आला. यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्हा प्रशासनाचे यश आहे. प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदर एक टक्‍क्‍याखाली येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first plasma therapy apheresis unit established all over state in ratnagiri online inauguration by CM uddhav tharye