कोकण : विजेवर चालणाऱ्या पहिल्या मालगाडीची चाचणी यशस्वी, लवकरच प्रवासी रेल्वेही धावणार

first railway goods carrier train run successfully passenger train coming soon in ratnagiri
first railway goods carrier train run successfully passenger train coming soon in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चार दिवसांपूर्वी रोहा ते रत्नागिरी सीआरएस (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच पहिली मालगाडी विजेवर चालवण्यात आली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून पाहण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासाठी सुमारे 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 741 किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर विद्युतीकरण प्रकल्प सुरु आहे. हा प्रकल्प जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. रत्नागिरी ते रोहा या मार्गावरील 31 डिसेंबर 2020 पर्यंत विद्युतीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र दोन महिने लांबणीवर गेले. 25 फेब्रुवारी 2021 ला रोहा ते रत्नागिरी मार्गावर कोकण रेल्वेने इलेक्ट्रीक इंजिनची चाचणी घेतली. ती यशस्वी झाल्यानंतर 31 मार्चला रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा तपासणी करण्यात आली. हा मार्ग विजेवर गाड्या चालवण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगचेच रविवारी (4) सोलापूरमधील कुर्डूवाडी जंक्शनहून कोकण रेल्वे मार्गावर येणारी पहिली मालगाडी विद्युत इंजिनवर धावली. 

विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी करण्यासह सध्या वर्षाकाठी डिझेलवर होणारा 100 कोटी रुपयांचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेकडून होत आहे. कोकण रेल्वेच्या रोहा ते रत्नागिरी या विद्युतीकरण झालेल्या मार्गावर पहिल्या गाडीचे सारथ्य लोको निरीक्षक रवी रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली लोको पायलट आकाश साळगावकर, सहाय्यक लोको पायलट जयेश मोरे तसेच गार्ड यू. वाय. राणे यांनी केले. रोहा येथून सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी ही गाडी रत्नागिरीकडे येण्यास निघाली. दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी विजेवर धावलेली पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर आली.

मालवाहतूक करणारी गाडी चालवण्यात यश आल्यामुळे आता प्रवासी गाड्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. पूर्ण क्षमतेची गाडी चालवण्यापुर्वी दोन ते तीन चाचण्या होणार आहेत. अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन काही डबे वाहून आणले जातील. त्यानंतर प्रवाशांना घेऊन एखादी कमी डब्याची गाडी आणली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्युतीकरणामुळे पहिल्या टप्प्यात दहा गाड्या विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन केले आहे. संभाव्य गाड्यांमध्ये कोकणकन्या, मांडवी, हजरत निझामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, सीएसएमटी - मंगळुरु एक्स्प्रेस, निझामुद्दीन - त्रिवेंद्रम सुपरफास्ट एक्स्प्रेस, निझामुद्दीन - तिरुअनंतपुरम सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com