एलईडीच्या भस्मासूरापासून रक्षण कर; मच्छीमारांचे साकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मालवण - ऐतिहासिक वारसा लाभलेला येथील नारळी पोर्णिमेचा उत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ समुद्रास अर्पण झाल्यानंतर मालवण व्यापारी संघाच्यावतीने तसेच मच्छीमार बांधवांच्यावतीने समुद्रास श्रीफळ अर्पण करण्यात आले.

मालवण - ऐतिहासिक वारसा लाभलेला येथील नारळी पोर्णिमेचा उत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ समुद्रास अर्पण झाल्यानंतर मालवण व्यापारी संघाच्यावतीने तसेच मच्छीमार बांधवांच्यावतीने समुद्रास श्रीफळ अर्पण करण्यात आले. एलईडीच्या भस्मासूरापासून आमचे रक्षण कर, व्यवसायात बरकत दे' असे साकडे मच्छीमार व व्यापारी बांधवांच्यावतीने सागरास घालण्यात आले. 

येथील नारळी पोर्णिमेच्या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. दरवर्षी किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे सोन्याचा मुलामा असलेले श्रीफळ सागरास अर्पण केल्यानंतर व्यापारी, मच्छीमार बांधवांच्यावतीने सागरास श्रीफळ अर्पण करण्यात येते. यावर्षीही शहरातील व्यापारी बांधव वाजतगाजत मिरवणूकीने सायंकाळी चार वाजता बंदर जेटी येथे दाखल झाले.

यात शहराध्यक्ष उमेश नेरूरकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये, परशुराम पाटकर, नितीन वाळके, सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बाळा पारकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, विजय नेमळेकर, नितीन सापळे, दीपक केळुसकर, संजय गावडे, गणेश प्रभुलीकर, बाळू अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास यांच्यासह अन्य व्यापारी बांधव यात सहभागी झाले होते.

किल्ले सिंधुदुर्गवरून सायंकाळी सव्वा चार वाजता मानाचे श्रीफळ अर्पण झाल्यानंतर व्यापारी, मच्छीमार बांधवांच्यावतीने श्रीफळ सागरास अर्पण करण्यात आले. एलईडीच्या भस्मासूरापासून आमचे रक्षण कर, मासेमारी हंगाम बहरू दे आणि व्यवसायात बरकत मिळू दे असे साकडे मच्छीमार, व्यापाऱ्यांच्यावतीने सागरास घालण्यात आले. शहरातील चिवला वेळा, धुरीवाडा, दांडीसह तालुक्‍याच्या किनारपट्टी भागात नारळी पोर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

नारळी पोर्णिमेचा सण हा मच्छीमारांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे किनारपट्टीमधील मच्छीमार बांधव, महिलांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले. बंदर जेटी येथे निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेलाही क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदर जेटी येथे गाबीत समाज बांधवांच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी स्टॉल उभारण्यात आला. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

नारळ लढविणे स्पर्धाही... 
नारळी पोर्णिमेच्या निमित्ताने बंदर जेटी परिसरात नगरसेवक यतीन खोत, सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्यावतीने महिलांसाठी जिल्हास्तरीय भव्य नारळ लढविणे स्पर्धा, मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्यावतीनेही महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा भरविण्यात आली होती. पुरुषांसाठीही नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisherman donate coconut to Sea