मच्छीमार एकजुटीचा विजय असो...

प्रशांत हिंदळेकर
रविवार, 8 डिसेंबर 2019

नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस आजपासून कोचीनच्या टाऊन हॉल येथे सुरवात झाली. सुरवातीस काढण्यात आलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोचीन (केरळ) - नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त आज कोची मरिन ड्राईव्ह येथून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा राज्यांतील मच्छीमार त्यात सहभागी झाले होते. मच्छीमार एकजुटीचा विजय असो..., समुद्र आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा अशा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. निळे झेंडे, निळी टोपी परिधान करून हजारो मच्छीमार रॅलीत सहभागी झाले होते. 

नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस आजपासून कोचीनच्या टाऊन हॉल येथे सुरवात झाली. सुरवातीस काढण्यात आलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत केरळ येथील पारंपरिक वाद्ये, कोळी वेशभूषा लक्षवेधी ठरली. कोचीन मरीन ड्राइव्ह येथून सुरू झालेल्या या रॅलीचा टाऊन हॉल येथे समारोप झाला. 

रॅलीत यांचा सहभाग

रॅलीत एनएफएफ राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री के. थॉमस, महाराष्ट्राचे सरचिटणीस टी. पीटर (केरळ), उपाध्यक्ष ओलांसीओ सिमॉइस (गोवा), डॉ. कुमार वेलू , सौ. ज्योती मेहर, कार्यकारिणी सदस्य देबाशिष (पश्‍चिम बंगाल), उस्मान भाई (गुजरात), रमेश धुरी, रविकिरण तोरसकर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष लिओ पोलोसो, उपाध्यक्ष किरण कोळी, रामकृष्ण तांडेल, राजन मेहर, फिलिप मस्तान, उज्ज्वला पाटील, पूर्णिमा मेहर, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, गोविंद केळुसकर, दाजी जुवाटकर, गुरू जोशी यांच्यासह अन्य मच्छीमार प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र

परिषदेत मच्छीमारांना भेडसावणाऱ्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा होणार आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविली जाणार आहे. नील अर्थव्यवस्था, सागरी मत्स्यपालन धोरण, मत्स्यव्यवसायातील महिलांचा सहभाग आणि समस्या तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, मार्गदर्शन होणार आहे. 

अधिवेशनात विविध मागण्या

परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण, अनधिकृत एलईडी मासेमारी, बेकायदा पर्ससीन मासेमारी तसेच मासेमारी कायद्यातील बदल आणि अंमलबजावणी याबद्दल आवाज उठवून राष्ट्रव्यापी आंदोलन उभे राहावे. जिल्ह्यातील मच्छीमारांची मागणी असलेला मत्स्यदुष्काळ राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर जाहीर होऊन मच्छीमारांना कर्जमाफी तसेच सानुग्रह अनुदान मिळावे, वर्षभरात आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, मत्स्यव्यावसायिक महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय समिती स्थापन व्हावी, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे रविकिरण तोरसकर यांनी स्पष्ट केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisherman National Conference In Kochin Keral