स्वाभिमानतर्फे उद्या मच्छिमारांचा एल्गार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

एक नजर

  • महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदानावर. 
  • मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी या विषयांवर चर्चा. 
  • आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठीच एल्गार मेळावा. 
  • स्वाभिमान जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत यांची माहिती. 

मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी या विषयांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी हा एल्गार मेळावा होत असल्याची माहिती स्वाभिमान जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली. 

या मेळाव्यामध्ये खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने गेले काही दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांनी मच्छीमारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यानुसार देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुक्यातील मच्छीमारांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. 

किनारपट्टी भागातील मच्छीमार कित्येक संकटांना तोंड देत आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात या मच्छीमारांची फार बिकट अवस्था झाली आहे. ज्या विश्‍वासाने सत्ताधार्‍यांना निवडून दिले. त्या खासदार, पालकमंत्री, आमदारांनी मच्छीमारांचा विश्‍वासघात केला. एलईडी मासेमारी, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी यामुळे येथील मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. राक्षसी मासेमारीमुळे समुद्राचा भकास होणार की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मच्छीमारांचे भविष्य आणि भवितव्य हे संपवायला निघाले आहेत. त्यामुळे या विरोधात स्वाभीमान पक्षाने पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला आहे. 

खासदार नारायण राणे आणि जिल्ह्यातील मच्छीमारांचे गेल्या तीस वर्षांपासूनचे अतूट नाते आहे. मच्छीमारांनी हाक मारली आणि ते धावले नाहीत असे कधीही घडलेले नाही. पण मधल्या काळात काही गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र राणे आणि मच्छीमार यांच्यात जास्त काळ दरी पडू शकत नाही. म्हणून आमदार नीतेश राणे यांनी मच्छीमारांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नीलेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्‍नांवर मोर्चा काढून त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठविला. राणे हे मच्छीमारांचे होते आणि यापुढेही राहतील. याच भूमिकेतून कोणतीही निवडणूक नसताना स्वाभीमान पक्षाने या मच्छीमार एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील मच्छीमार बांधव, भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.  सामंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सावंत यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishermen Elgar Mealva by Swabhiman party in Malvan