आंजर्लेत ९५ टक्के मच्छीमारी नौका उभ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan fishing

आंजर्लेत ९५ टक्के मच्छीमारी नौका उभ्या

हर्णै : १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासळी उद्योगाच्या हंगामामध्ये मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांपैकी फक्त ५० टक्के मच्छीमारांनाच बऱ्यापैकी फायदा झाला असून उर्वरित मच्छीमारांना मात्र वातावरणामुळे मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सवामुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्पच आहे. आजच्या परिस्थितीत ९५ टक्के नौका हंगाम सुरू होऊनदेखील आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर वातावरण पोषक झाले तरच मासळी उद्योग व्यवस्थितरित्या सुरू होईल, असे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. १ ऑगस्ट या मुहूर्ताच्या दिवशी वातावरण चांगले होते; परंतु दोन दिवसांनी वातावरण बिघडले. मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची धावपळ उडाली. मुहूर्ताच्या सुरवातीच्या दोन दिवसात जेमतेम ५० नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. पुढे वातावरण पोषक बघून एकूण किमान १२५ नौका मासेमारीकरिता समुद्रात गेल्या होत्या. मासेमारीस गेलेल्या मच्छीमारांपैकी ५० टक्केच मच्छीमारांना बऱ्यापैकी मासळी मिळाल्याने फायदा झाला. उर्वरित मच्छीमारांचे मात्र चांगलेच नुकसान झाले आहे.आणखी काही सामानयासाठी किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येतो. सध्या मच्छीमार बांधवांची आर्थिक स्थिती खूपच खालावली आहे. २०१८ पासून डिझेल परतावाच मिळालेला नाही. परतावा जर मिळाला तर मच्छीमारांना या हंगामात उद्योग सुरू करण्यास उपयुक्त ठरेल.

हर्णै बंदरात हंगामामध्ये आजूबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९०० नौका मासेमारीकरिता येतात. गेल्या काही वर्षांपासून मासेमारीच्या सुरवातीच्या मुहूर्ताच्या काळात समुद्रात चक्रीवादळ तसेच खराब हवामान असल्याने मासेमारी हंगामाला विलंबाने सुरवात होत होती. यंदाच्या सुरवातीचे वातावरण मासेमारीसाठी अनुकूल होते; परंतु दोन दिवसांनी वातावरण बिघडले. मासेमारी ठप्प झाल्यामुळे बंदरातील सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. या हंगामाला सुरवात करताना मच्छीमारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

खलाशी आले नाही तर कोणाच्या नौकांची अजूनही डागडुजीची कामे सुरू आहेत तर कोणाकडे मासेमारीकरिता तयारी करण्याकरिता पैसाच नसल्यामुळे ते थांबले आहेत.शासनाने गेल्या २०१८ पासूनचा परतावा दिला तर मच्छीमारांना काहीतरी दिलासा मिळेल. वेळीच परतावा दिला तर मच्छीमार यावर्षी मासळी हंगामात उद्योग चालू करू शकेल.

- अनंत चोगले, मच्छीमार

सध्या बंदर ठप्प झाले आहे. आजच्या परिस्थितीत ९५ टक्के नौका आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत. २५ नौका जयगड खाडीत उभ्या आहेत. साधारण १० ते १२ नौका मासेमारी करत आहेत.

- अंकुश दोरकुळकर, मच्छीमार