मत्स्योत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम ; साडेसात हजार टन घटले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

साडेसात हजारांची घट असून बांगड्याचे उत्पादन १० हजार टनाने घटले.

रत्नागिरी : माशांच्या अन्नसाखळीतील बदल आणि गतवर्षी झालेल्या क्‍यार, महा चक्रीवादळाचा मत्स्योत्पादनावर परिणाम झाला आहे. बांगडा, तार्लीसह पापलेट, सुरमईसारखी सोनेरी मासळी रत्नागिरीच्या किनाऱ्यावरुन हळूहळू कमी होऊ लागली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ६६,१७३ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. गतवर्षी ७३ हजार ७३८ मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते. तुलनेत साडेसात हजारांची घट असून बांगड्याचे उत्पादन १० हजार टनाने घटले.

हेही वाचा - चिऱ्यापासून टाईल्स! देवगडात तंत्र विकसित -

जिल्ह्यात बुरोंडी, दाभोळ, मिरकरवाडा, हर्णै या प्रमुख बंदरांसह २१ ठिकाणी मासळी उतरवली जाते. गेल्या पाच वर्षात सातत्याने मत्स्योत्पादनात मोठी घट होत आहे. मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. पर्ससिनवर निर्बंध घालूनही घट वाढतच आहे. क्‍यार आणि महा वादळांसह परराज्यातील नौकांचे अतिक्रमण उत्पादन घटीचे महत्त्वाचे कारण आहे. दरवर्षी कर्नाटक, केरळसह परजिल्ह्यातील अनेक मच्छिमारी नौका मासळीची लूट करतात. एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीचा गोंधळ अजूनही सुरुच आहे.

कोकण किनारपट्‌टीवरील अन्नसाखळीचे संतुलन बिघडल्यामुळेही उत्पादनात घट होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. सुरमई, पापलेट, बळा, बोंबील, वाशी, स्कीड, कोळंबी या प्रमुख उत्पन्न देणाऱ्या माशांची घट सुमारे पाच हजार मे.टनाची आहे. राणीमाशाचे तीन हजार टनानी उत्पादन घटले. मच्छीमारांचे अर्थकारण अवलंबून असलेला बांगड्याचे गतवर्षी १६ हजार ७५२ मे.टन उत्पादन होते. यंदा त्यात दहा हजार मे.टनाची घट आहे. अवघा ६ हजार १२७ मे.टन बांगडा जाळ्यात सापडला; मात्र गतवर्षीच्या तुलनेत तार्ली, कोळंबी, खवळी, म्हाकुळाचे उत्पादन शंभर टनाने वाढले आहे.

हेही वाचा -  तीनदा हमीपत्रे, तरीही भरपाई नाही -

जिल्ह्यातील मागील मत्स्योत्पादन 

    वर्ष          मत्स्योत्पादन टन
२००५-०६    १ लाख ५ हजार ६९
२००७-०८    ८५ हजार ९९
२०१४-१५    १ लाख १५ हजार ४२
२०१५-१६    ८७ हजार ०३०
२०१६-१७    ९८ हजार ४४३          
२०१७-१८    ८० हजार ३४०
२०१८-१९    ७३ हजार ७३८ 
२०१९-२०    ६६ हजार १७३
 

"चक्री वादळाच्या तडाख्यामुळे गतवर्षी मासेमारी ठप्प होती आणि मच्छीही प्रवाहाबरोबर पुढे सरकली. परराज्यातील बोटींमुळे मोठ्या प्रमाणात मासळीची लूट 
झाली होती."

- अभय लाकडे, मच्छीमार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishing production decreases in this year rupees seven and half thousand ten in ratnagiri