मच्छीमारांना दिलासा ; वादळामुळे थांबलेली मासेमारी झाली सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

गेला दीड महिन्याचा मासेमारी हंगाम प्रचंड नुकसानीत गेला आहे. गेले चार पाच दिवस वादळी वातावरण होते.

हर्णे - गेल्या दीड महिन्यापासून वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मासेमारीला ब्रेक लागला होता. परंतु, कालपासून(ता.२४) वातावरण निवळल्यामुळे आंजर्ले खाडीत असणाऱ्या काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास सुरुवात केली आहे. पुढिल दोन दिवसात वातावरण शांत राहिले तर सर्व नौका मासेमासाठी खाडीतून बाहेर पडतील असे येथील मच्छीमार अनंत चोगले यांनी सांगितले.
 

हर्णे बंदरामधील मासेमारी उद्योगावर वादळाने कुऱ्हाडच फिरवली होती. शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्टपासून चालू झालेल्या मासेमारीला वादळामुळे मासळी  मिळण्याचा मुहूर्तच मिळत नव्हता. वादळांमुळे मासेमारीला गेल्यानंतर जवळपास असणाऱ्या म्हणजे कधी दिघी(रायगड), आंजर्ले, जयगड, दाभोळ (रत्नागिरी) या खड्यांमधून आसरा घ्यावा लागत होता. येणाऱ्या वादळामध्ये वाऱ्याची दिशा ही दक्षिणेकडून होती.  दक्षिणेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्याचा मोठा फटका हर्णे बंदरालाच बसण्याचा धोका असतो आणि हे बंदर अजूनही सुरक्षित नाही. त्यामुळे गेल्या दिड महिन्यात फक्त हर्णे बंदरातील मच्छीमारांचीच फरफट उडाली होती. 

२१ सप्टेंबरपासून ते २५ सप्टेंबर पर्यंत वादळाचा इशारा दिला होता. त्यामुळे मच्छीमारांनी कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून नौका मिळेल त्या खाडीत घुसवल्या होत्या. वातावरण निवळल्यामुळे आता कालपासून मच्छीमारांनी समुद्रात मासेमासाठी जाण्याचं धाडस केले आहे. असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

हे पण वाचाये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है! ; नितेश राणे

 

गेला दीड महिन्याचा मासेमारी हंगाम प्रचंड नुकसानीत गेला आहे. गेले चार पाच दिवस वादळी वातावरण होते. परंतु काल(ता.२४) काही नौकांनी वातावरण थोडं निवळल्यावर मासेमारीला बाहेर पडण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे आजही आंजर्ले खाडीतून बऱ्याचशा नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या आहेत. दोन दिवस असेच वातावरण शांत राहीले तर ज्या ज्या खाडीत नौका आहेत त्या सर्व नौका मासेमारीसाठी बाहेर पडतील असे येथील मच्छीमार श्री. अनंत चोगले यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishing started in ratnagiri