बदलत्या वातावरणाचा फटका, शेकडो नौका थांबल्या, सतर्कतेच्या सूचना

संतोष कुळकर्णी
Sunday, 13 September 2020

विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सध्या समुद्रात वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने सावधगिरी बाळगून मच्छीमारी सुरू आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) - किनारपट्टीवरील बदलते हवामान आणि समुद्रात निर्माण झालेली वादळ सदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक लागला आहे. आज येथील बंदरात शेकडो नौका थांबून होत्या. वातावरणाचा अंदाज घेत काहींनी नौका समुद्रात लोटत धिम्या गतीने मासेमारी सुरू केली. मात्र तरीही प्रशासानाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

गणेशोत्सव झाल्यावर मच्छीमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. सध्या हंगाम सुरु झाला होता. पापलेट, सरंगा, सुरमई, कोळंबी आदी किंमती मासळी मिळत होती. लॉकडाउन नंतर नव्या हंगामाची चाहूल लागली असतानाच सध्या किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सध्या समुद्रात वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने सावधगिरी बाळगून मच्छीमारी सुरू आहे.

काही प्रमाणात वादळी स्थितीही आहे. सध्या नौकांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत. सध्या किनारपट्टीवरील वातावरण बदलत असल्याने काहींनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. काही नौका येथील बंदरात थांबून होत्या. काहीजण सावधानता बाळगत मच्छीमारी करीत असल्याचे चित्र होते. असे असले तरी एकूणच सध्या जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक लागला आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fishing stopped konkan sindhudurg