esakal | धक्कादायक! विनाकारण फिरणाऱ्या १४५ पैकी पाच पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

धक्कादायक! विनाकारण फिरणाऱ्या १४५ पैकी पाच पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे; मात्र आज विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलसांनी कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने जप्त करून त्यांची तेथेच कोरोना चाचणी करण्यात आली. १४५ जणांची सायंकाळपर्यंत अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांना तत्काळ कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले.

जिल्ह्यात आजपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभारली आहेत. त्या केंद्रांवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. घराबाहेर पडण्याचे ठोस कारण असेल त्यांना मुभा दिली जात आहे; मात्र विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांची तत्काळ कोरोना चाचणी केली जात आहे. किराणा खरेदीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडावा आणि जवळच्याच दुकानातून किराणा खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

प्रत्येकाच्या रेशनची जबाबदारी शासनाने घेतली आहे. केवळ मेडिकल, अत्यावश्‍यक सेवेसाठीच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना मारुती मंदिर येथे अडवून तपासणी केली.

तिथे आरोग्य पथकही नेमण्यात आले आहे. यामध्ये परजिल्ह्यातून आलेल्या वाहनधारकांचा समावेश आहे. त्यांची वाहने ताब्यात घेऊन लगेच अँटिजेन टेस्ट केली. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनांच्या मारुती मंदिर येथे रांगा लागल्या होत्या. जी वाहने ताब्यात घेतलेली होती, त्यांना संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने ताकीद देऊन वाहने त्यांच्या ताब्यात दिली. सायंकाळी उशिरापर्यंत १४५ जणांची कोरोना चाचणी केली आहे. त्यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

संचारबंदीला प्रतिसाद

जिल्ह्यात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी पथके तैनात केली आहेत. गुरुवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. संचारबंदीचा एसटी सेवेवर मोठा परिणाम दिसून आला. प्रवासी नसल्याने एसटीच्या ९० टक्के फेऱ्या बंद होत्या. उगाचच फिरणाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला. कारवाईसाठी पोलिस रस्त्यावर उतरले. शहरात मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू होती, मात्र पोलिस रस्त्यावर येताच रस्त्यावरची वाहतूक बंद झाली.

Edited By- Archana Banage