सिंधुदुर्गातील पाच हजार तरुण कशामुळे झाले बेरोजगार ?

शिवप्रसाद देसाई
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनामुळे गोव्याने सीमा बंद केल्या. या काळात जिल्ह्यातून गोव्यात ये-जा करणारे अडकले. अनेकजण घाबरून तर काहीजण काम नसल्याने सिंधुदुर्गात आले आणि लॉकडाऊन झाले. याच दरम्यान गोव्याने टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करायला सुरूवात केली.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - लॉकडाऊनमुळे गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे पाच हजार तरुणांनी आतापर्यंत नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यातील अनेकांवर कुटुंब चालवण्यासाठी मजुरीची वेळ आली आहे. हॉटेल व्यवसाय अद्याप सुरू झाला नसल्याने या क्षेत्रात मोठ्या संख्येने काम करणाऱ्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. 

कोरोनामुळे गोव्याने सीमा बंद केल्या. या काळात जिल्ह्यातून गोव्यात ये-जा करणारे अडकले. अनेकजण घाबरून तर काहीजण काम नसल्याने सिंधुदुर्गात आले आणि लॉकडाऊन झाले. याच दरम्यान गोव्याने टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करायला सुरूवात केली. आता जिल्ह्यात अडकलेल्यांनी कामाच्या ठिकाणी चौकशी सुरु केली आहे; पण त्यांना नोकरी गमवल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ही संख्या 5 हजारापर्यंत पोहोचली आहे. 

जॉब गमावल्यांमध्ये अकुशल कामगार 

गोव्यात काणकोण, कुंडई, बेफोडा, शिरोडा, म्हापसा, मडगाव, जुने गोवे खोर्ली, फोंडा, पिसुर्ले, करासवाडा, कोलवाल, डिचोली आणि वेर्णे या प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. यापैकी वेर्णे आणि कुंडई या सगळ्यात मोठ्या एमआयडीसी असून याची प्रत्येकी रोजगार क्षमता 30 हजारच्या घरात आहे. सिंधुदुर्गातील बहुसंख्य तरुण वेर्णे आणि कुंडई येथे नोकरी करतात. यात प्रामुख्याने अकुशल कामगारांचा समावेश आहे.

हे कामगार थेट कंपनीशी संलग्न नसतात. लेबर कॉन्ट्रॉक्‍टरमार्फत त्यांची नियुक्‍ती होते. सध्या नोकऱ्या गमावल्यांमध्ये अशा अकुशल कामगारांचा समावेश आहे. लॉकडाऊन शिथीलतेनंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू झाला तेव्हा जिल्ह्यातील तरुण येथेच अडकले होते. त्यांची वाट न पाहता नव्या कामगारांची नियुक्‍त केली गेली. यामुळे इथल्या स्थानिकांनी नोकऱ्या गमावल्या. 

मजुरीकडे कल 
या तरुणांची आर्थीक स्थिती बिघडल्याचे सार्वत्रीक चित्र आहे. काहींनी रोजगारासाठी अक्षरशः मजुरी सुरू केली आहे. नोकऱ्या गमावण्याचा हा सिलसीला इथेच थांबलेला नाही. गोव्यातील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जिल्ह्यातील अनेकजण नोकरी करतात. ही इंडस्ट्री अद्याप सुरू झालेली नाही. सुरू झाली तरी त्यातही मंदी असण्याची मोठी भिती आहे. यामुळे जिल्ह्यातील आणखी कित्येक तरुण पुढच्या काळात नोकरी गमावतील अशी भिती आहे. 

गोव्यात हॉटेल्स सुरू करण्याच्या हालचाली 
गोव्यात हॉटेल्स सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एक जुलैपासून हा व्यवसाय सुरू होणार आहे. यासाठी गोवा सरकारने ऑनलाईन माहिती मागवली आहे. यात हजार पैकी दीडशे हॉटेल व्यावसायीकांनी नोंदणी केली आहे; मात्र पर्यटनावर असलेले मंदीचे सावट लक्षात घेता हा व्यवसाय पुढचे वर्षभरतरी मंदीच्या ट्रॅकवरच राहील अशी भिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Thousand Youth Lost Job In Sindhudurg Marathi News