संततधारेमुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, जाणून घ्या सविस्तर

प्रशांत हिंदळेकर
Monday, 17 August 2020

या रस्त्यावरील पेंडूर नाका येथे असलेल्या ओढ्याचे पाणी पावसाळ्यात ओढ्यावर असलेल्या पुलावर येत असल्याने वाहतूक खोळंबा होतो. हे पाणी ओसरेपर्यंत वाहनचालकांना वाट पाहावी लागते.

मालवण (सिंधुदुर्ग) - गेले दोन तीन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पेंडूर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून कट्टा पेंडूरमार्गे कुडाळ या रस्त्यावरील पेंडूर नाका नजीक असणाऱ्या ओढ्यावरील पुलावर आज पाणी आल्याने सकाळच्या सत्रात काही काळ वाहतूक खंडित झाली होती. 

वाचा - Good News : कोकणातल्या या शहराला मिळणार पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस 

पेंडूर नाका नजीक असणाऱ्या ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्याने या पुलाची व नजीकच्या रस्त्याची उंची वाढविण्यात यावी तसेच ओढ्यातील गाळ काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. कट्टा पेंडूर मार्गे कुडाळ या रस्त्यावरून कट्टा, पेंडूर, काळसे, कुडाळ येथील वाहनांची रहदारी असते; मात्र या रस्त्यावरील पेंडूर नाका येथे असलेल्या ओढ्याचे पाणी पावसाळ्यात ओढ्यावर असलेल्या पुलावर येत असल्याने वाहतूक खोळंबा होतो. हे पाणी ओसरेपर्यंत वाहनचालकांना वाट पाहावी लागते.

हेही वाचा - Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर 

अशावेळी रुग्णवाहिका, शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांची मोठी अडचण होते. पेंडूर तलाव ते कर्लीच्या खाडीपर्यंत असणाऱ्या ओढ्यात भरपूर गाळ साचल्याने तसेच ओढ्याच्या पात्रात झाडी वाढल्याने ओढ्यातील पाणी नदीत जाताना अडथळे येतात. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक खोळंबते. त्यामुळे पुलाची व नजीकच्या रस्त्याची उंची वाढवावी, ओढ्यातील गाळ उपसा करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in Pendur area konkan sindhudurg