#KonkanRains रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, संगमेश्‍वर जलमय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमश्‍वर नदीकिनाऱ्यावरील शहरे, गावे जलमय झाली. अर्जुनाच्या पुरामुळे राजापूर शहर 24 तास पुराच्या पाण्याखाली होते. काजळी नदीला आलेल्या पुराने चांदेराई बाजारपेठ रात्रभर पाण्यात राहिली. पावसाचा फटका चिपळूण आणि संगमेश्‍वरलाही बसला असून बाजारपेठ आणि परिसरात पाणी भरले आहे. 

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमश्‍वर नदीकिनाऱ्यावरील शहरे, गावे जलमय झाली. अर्जुनाच्या पुरामुळे राजापूर शहर 24 तास पुराच्या पाण्याखाली होते. काजळी नदीला आलेल्या पुराने चांदेराई बाजारपेठ रात्रभर पाण्यात राहिली. पावसाचा फटका चिपळूण आणि संगमेश्‍वरलाही बसला असून बाजारपेठ आणि परिसरात पाणी भरले आहे. 

मंगळवारी (ता. 30) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 93.78 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 110, दापोली 87, खेड 120, गुहागर 82, चिपळूण 120, संगमेश्‍वर 104, रत्नागिरी 50, लांजा 160, राजापूर 11 मिमी नोंद आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

वेगवान वाऱ्यामुळे त्यात भर पडत आहे. राजापूर शहरातील जवाहर चौक आणि परिसर बुधवारी सायंकाळपर्यंत पाण्याखाली होता. रात्रीच्यावेळी पूर आला असला तरीही तेथील व्यापाऱ्यांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने अनुचित प्रकार टळला. चिपळूण शहरामध्येही तीच परिस्थिती आहे; परंतु आधीचा अनुभव असल्यामुळे व्यावसायिक सतर्क होते. 

आंबा घाटात उगम असलेल्या काजळी नदीला पूर आल्यामुळे मंगळवारी (ता. 29) रात्री चांदेराईवासीयांची तारांबळ उडाली. साडेबारा वाजता सरपंचांसह दादा दळी यांनी व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यानंतर बाजारपेठेतील दुकानदारांची साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी धावपळ सुरू झाली.

पुराचे पाणी येण्याच्या भीतीने अनेक दुकानदारांनी रात्रभर जागरण केले. रत्नागिरी-देवधे- लांजा मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे बुधवारी (ता. 30) दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद होती. एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक गावांचा रत्नागिरी आणि लांजा तालुक्‍याशी संपर्क तुटला होता. अचानक एसटी रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थी ताटकळत एसटी थांब्यावर प्रतीक्षा करत होते.

या बाजारपेठेतील सुमारे 35 व्यावसायिकांना याचा फटका बसला असून बुधवारीही बाजारपेठ बंद होती. काजळी नदीचे पाणी नदीपात्रा शेजारील शेतामध्येही घुसले असून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. चांदेराई ते सोमेश्वर, काजरघाटी भागातही पुराचे पाणी किनारी भागात घुसले होते. टेंबेपूल येथील तीन घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले. पाऊस आणि भरती दोन्हीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. 

उंबरशेतला डोंगर कोसळला 

दापोली तालुक्‍यातील ऊंबरशेत-नवानगर येथे डोंगराचा भाग कोसळल्याने दहा ते बारा घरांना धोका निर्माण झाला होता. तेथील सहा घरांमधील लोकांची सुरक्षित ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पंचनदी-कडूवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे तळी कोसळून 90 हजाराचे नुकसान झाले. चिपळूण रानतळीत दरड कोसळून पाइपलाइन फुटली. त्याचे पाणी जवळच्या घरात गेल्यामुळे नुकसान झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Ratnagiri, Chiplun, Rajapur, Sangmeshwar