सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; रघुनाथ महाराजांच्या कारकिर्दीला सुरूवात

आनासाहेब यांच्या निधनावेळी त्यांचे एकुलते एक पुत्र रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब हे गादीचे वारस होते
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; रघुनाथ महाराजांच्या कारकिर्दीला सुरूवात

सिंधुदुर्ग : चौथे फोंडसावंत उर्फ आनासाहेब यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पुत्र रघुनाथ उर्फ बाबासाहेब हे गादीचे मालक झाले; मात्र त्यावेळी ते अवघे आठ वर्षांचे होते. यामुळे कारभार ब्रिटीशांच्या हातातच राहिला. या काळात ब्रिटीशांनी पायाभूत सुविधांवर विशेष काम केले. यात प्रामुख्याने आंबोलीचा घाटरस्ता आणि या गावच्या हिल स्टेशन म्हणून जडणघडणीचा समावेश आहे. राज्य व्यवस्थेचे सुसुत्रीकरण, जमिन मालकीची शिस्तबध्द नोंदणी तसेच शिक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणही याच कालावधीत झाले.

आनासाहेब यांच्या निधनावेळी त्यांचे एकुलते एक पुत्र रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब हे गादीचे वारस होते. १९ ऑगस्ट १८७० मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. १८६९ मध्ये जन्मलेले बाबासाहेब त्यावेळी अवघे आठ वर्षांचे होते. यामुळे सज्ञान राजा नसल्याचे कारण देत ब्रिटिशांनी कारभार आपल्याकडेच ठेवला. तत्कालीन पॉलिटीकल सुप्रिटेन्डंट स्नायडर यांनी संस्थानच्या व्यवस्थेत अधिक प्रभावी बदल करायला सुरुवात केली. या काळात ब्रिटीशांनी देशात इतरत्र केलेले विविध कायदे, धोरणे यांचा अंमल सावंतवाडीतही हळूहळू सुरू झाला. कायम शर्तीवर ठरलेली ठिकाणे कसण्यासाठी देण्याची पध्दत होती. अशी २४२ ठिकाणे होती. या पध्दतीचा अंमल १८६८ मध्ये सुरू झाला होता. ही पध्दत १८७२ मध्ये बंद करण्यात आली. १८७० पासून जमिनीचे धारे ठरवण्यासाठी जमिन मोजण्याचे काम सुरू झाले.

पूर्वी समुद्री मार्गे व्यापार चालायचा. शिवाय सत्ता राखण्याच्या दृष्टीनेही समुद्रावर वर्चस्व महत्त्वाचे असायचे. कारण शत्रू समुद्री मार्गे येण्याची शक्यता जास्त असायची. आंबोलीसह सर्वच सह्याद्रीच्या रांगांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली आहे. त्यामुळे प्रचंड उंच-सखल कडे, दर्‍या या रांगांमध्ये आहेत. वरचा भाग समुद्राला जोडण्यासाठी या रांगांमधून रस्ता काढणे अत्यावश्यक होते. त्या काळात बेळगाव रामघाट मार्गे रस्ता हा एकच पारंपारीक पर्याय उपलब्ध होता. या रस्त्याला पर्यायावर काम सुरू झाले होते.

बेळगावहून तिलारी-रामघाट मार्गे येणारा रस्ता लांबचा आणि दुर्गम होता. त्या काळात ब्रिटिशांचा लष्करी तळ बेळगावमध्ये होता. रेडी, वेंगुर्ले ही बंदरे त्या काळात महत्त्वाची होती. डच लोकांच्या वास्तव्यामुळे वेंगुर्लेचे महत्त्व वाढले होते. त्यामुळे बेळगाव ते वेंगुर्ले मार्ग काढण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. युद्धसामग्री, सैन्य याची वाहतूक हा या मागचा मुख्य उद्देश होता. त्यापूर्वी पारपोली मार्गे सावंतवाडीतून आंबोलीत जायचा मार्ग होता; मात्र तो पायवाट स्वरूपाचा होता. साहजीकच आंबोली पर्याय म्हणून पुढे आले. ब्रिटिशांना एका धनगराने आताचा घाटाचा मार्ग दाखविला. यावर १८६१ पासूनच काम सुरू झाले होते. स्नायडर यांच्या काळात नोव्हेंबर १८६९ मध्ये आंबोली घाट पूर्ण झाला.

त्यासाठी १३ लाख ९९ हजार ३२५ रूपये इतका खर्च आला. त्या काळात रस्त्याच्या डागडुजीसाठी ठराविक रकमेची तरतूदही केली होती. या रस्त्यामुळे दळणवळणात मोठी क्रांती झाली. त्याकाळात वेंगुर्ल्याहून रामघाटमार्गे बेळगावला जायला १५ रूपये गाडीभाडे होते. आंबोलीमुळे ते ५ रूपयावर आले. याचा सगळ्यात जास्त फायदा व्यापाराला झाला. स्नायडर यांच्या काळात अनेक कामे झाली. यामुळे राज्यकारभारात सुव्यवस्था येण्याबरोबरच उत्पन्नातही वाढ झाली. २१ एप्रिल १८७४ ला कर्नल स्नायडर यांची बढतीने कोल्हापूरचे पोलिटिकर एजंट म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी कर्नल लेस्टर यांची नेमणूक झाली

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; रघुनाथ महाराजांच्या कारकिर्दीला सुरूवात
‘जीएसटी’चा निर्णय विनाशाकडे नेणारा

कर्नल लेस्टर हे पूर्वी शिक्षण विभागात एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. त्यांनी संस्थानात शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष काम केले. मातृभाषेतील शिक्षणावर त्यांचा भर होता. त्यांनी मराठी शाळांची संख्या बरीच वाढवली. याच काळात आधुनिक शिक्षणक्रम सुरू करण्यात आला. पूर्वी जमिन दस्त नोंदणीचे काम ऐच्छिक असायचे. १५ फेब्रुवारी १८७६ पासून जमिन दस्त नोंदणी बंधनकारक करून तसा नियम बनविण्यात आला. पूर्वी दप्तरदार जमिन नोंदणी ठेवायचे. ती पदे कमी करून प्रत्येक पेट्यात सबरजिस्टार नेमण्यात आले. यामुळे जमिनीची मोजणी होवून मालकीचे रोकॉर्ड बनू लागले. त्यांच्या काळात १८७४ मध्ये संस्थानात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. धान्याचे दर वाढले. त्याची उपलब्धताही होईना. त्यामुळे घाटावरून धान्य आणून ते लोकांना उपलब्ध करून देण्यात आले; मात्र आणखी दोन वर्षांनी म्हणजेच १८७६ मध्ये देशभर मोठा दुष्काळ पडला. याचा परिणाम सावंतवाडी संस्थानवरही दिसला. धान्य आणि चार्‍याचे दर तिपटीने वाढले. घाटमाथ्यावरील हजारो लोक गुरे-ढोरे आणि कुटुंब कबिल्यासह कोकणात उतरले. या गोरगरिबांसाठी कर्नल लेस्टर यांनी विशेष काम केले.

त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच धान्याचा साठा करून त्याचा योग्य प्रमाणात पुरवठा सुरू केला. यामुळे प्राणहानी टळली. १४ ऑगस्ट १८७७ मध्ये कर्नल लेस्टर निवृत्त होवून मायदेशी गेले. त्यांच्या जागी लेप्टनंट कर्नल जी. आर. सी. वेस्ट्रॉप यांची नियुक्ती झाली. त्याचवर्षी सावंतवाडी शहरात आरोग्य सुविधा राबवणे सोपे जावे म्हणून नगरपालिकेची स्थापना केली गेली. १८७८ मध्ये संस्थानातील विविध कामांसाठी स्टेट कारभारी व दिवाणी कारभारासाठी ज्युडिशीयल असिस्टंट टू दी पोलिटिकल सुप्रिटेंन्डट अशा दोन अधिकार्‍यांची नेमणूक केली गेली. स्टेट कारभारी याला डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटचा अधिकार दिला गेला. ज्युडिशियल असिस्टंट यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी पदाचा अधिकार बहाल करण्यात आला. पहिले स्टेट कारभारी म्हणून रावबहाद्दूर वामनराव पितांबर चिटणीस यांनी नेमणूक करण्यात आली. ते संस्थानमध्ये दरकदार होते.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; रघुनाथ महाराजांच्या कारकिर्दीला सुरूवात
‘जीएसटी’तील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय

इंग्लंडच्या राणीसाठी सावंतवाडीत भरला दरबार

जानेवारी १८७७ मध्ये महाराणी व्हीक्टोरिया यांनी केसर -द-हिंद अर्थात हिंदूस्थानची बादशाहीण असा किताब धारण करण्यासाठी दिल्लीत मोठा दरबार भरवला होता. यावेळी सावंतवाडी संस्थानतर्फेही सावंतवाडीत दरबार भरवून राजनिष्ठा दाखवण्यात आली. यावेळी दिल्ली दरबारात येथील राजांतर्फे एक बावटा (दिल्ली बॅनर) तयार करून तो पाठवण्यात आला.

आंबोली आणि ब्रिटिश

वेस्ट्रॉप यांनी आंबोलीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १८७९ मध्ये आंबोलीचा हिल स्टेशन म्हणून विकास केला. तेथे बाजारपेठ वसवली. तिथली पर्यटनस्थळे शोधून त्याचा विकास केला. थंड हवेचे ठिकाण असल्याने राजघराण्यातील लोक, ब्रिटीश अधिकारी, श्रीमंत घराण्यातील माणसे तेथे हवापालटासाठी राहायला यायची. एका अर्थाने सिंधुदुर्गात पर्यटनाची बिजे पेरणारा हा बदल म्हणावा लागेल. तेथे पुढे त्यांनी विश्रामगृहही बांधले. १८ नोव्हेंबर १८७८ला मुंबई विभागाचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल हे सावंतवाडीत आले होते. सावंतवाडीतील सृष्टीसौंदर्य आणि कारभारात झालेले बदल पाहून त्यांनी कौतुक केले होते. नंतर रिचर्ड टेंपल आंबोलीत काही दिवस राहून गेले. त्यांच्या सन्मानार्थ आंबोलीतील एका टेकडीला टेंपल टेकडी असे नाव देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com