परराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign fishermen attack fish at Ganpatipule

गेले आठवडाभर वादळामुळे समुद्र खवळल्याने हर्णैमधील नौकांसह परजिल्ह्यातील, परराज्यातीलच शेकडो नौका जयगड बंदरात आश्रयाला आल्या होत्या.

परराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला 

रत्नागिरी -  चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या प्रवासात याच परराज्यातील नौकांनी गणपतीपुळेपासून काही अंतरावर मासेमारी केली. त्यामुळे शनिवारी (ता. 26) सकाळपासून गणपतीपुळे ते जयगड परिसरात हजारो मच्छीमारी नौका मासेमारी करत होत्या. त्यांच्यासह स्थानिकाना म्हाकुळ, पापलेट, चालू चिंगळं, सरंगा यासारखी मिश्र मासळी मिळाली. 

गेले आठवडाभर वादळामुळे समुद्र खवळल्याने हर्णैमधील नौकांसह परजिल्ह्यातील, परराज्यातीलच शेकडो नौका जयगड बंदरात आश्रयाला आल्या होत्या. शुक्रवारी वातावरण निवळल्यामुळे त्या नौकांनी घरचा मार्ग धरला. गणपतीपुळे ते जयगड या परिसरात प्रजननासाठी मासळी येते. पाऊस संपल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. वादळ ओसरल्यानंतर खोल समुद्रात गेलेले मासे पुन्हा किनारी भागाकडे वळले आहेत. स्थानिक मच्छीमारांनी या भागात काही प्रमाणात मासेमारी सुरू केली. याची भनक परराज्यातून आलेल्या या मच्छीमारांना लागल्यामुळे माघारी परतत असताना माशांची खाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भागात परराज्यातील मच्छीमारांनी येथे जाळी मारली, असे स्थानिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.


गणपतीपुळेमधून नौकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत या नौका मासेमारी करत होत्या. स्थानिक मच्छीमारांचा आधार असलेल्या भागावर परराज्यातील मच्छीमारांनी डल्ला मारल्यामुळे आधीच खड्ड्यात असलेल्या स्थानिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार अशी चर्चा सुरू आहे. काळबादेवी, कासारवेली, जयगड, रत्नागिरीसह तालुक्यातील मच्छीमारी नौकाही मासेमारी करत होत्या.

हे पण वाचा''छत्रपती घराणे आमची अस्मिता ; खासदार संभाजीराजेंना दुखावण्याचा हेतू नव्हता''

वादळामुळे शेकडो नौका जयगड बंदरात आश्रयासाठी दाखल झालेल्या होत्या. त्या हळूहळू परतीच्या मार्गाला लागल्या आहेत. गणपतीपुळे जवळ माशांचा रिपोर्ट मिळाल्याने शनिवारी मासेमारी करणार्‍या नौका दिसत होत्या.

- राजेश पालशेतकर, सैतवडे

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top