"सेनेची वागणूक वेदना देणारी ;  नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच"

राजेश शेळके
Saturday, 31 October 2020

मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.

रत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. वेळ आल्यावर माझी भूमिका जाहीर करेन. शिवसेनेने मला भरपूर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमची श्रद्धा आहे. पक्षाशी मी प्रामाणिक राहिलो आहे. 

मात्र नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सेनेकडून मिळालेली वागणूक वेदना देणारी आहे, अशी स्पष्ट नाराजी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
राहुल पंडित आणि भाजपचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांची कोजागिरीच्या दिवशी भेट झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याशी अनौपचारिक चर्चेवेळी त्यांनी अंतर्गत गोष्टी उघड केल्या.

राहुल पंडित यांना थेट नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिले होते; मात्र पक्षांतर्गत तडजोडीमुळे त्यांना अडीच वर्षानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मात्र सेनेकडून ते विस्मरणात गेल्याप्रमाणे त्यांना वागणूक मिळत गेली. पक्षासाठी त्यांनी पदाचा त्याग केला; मात्र त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाला त्यांना बोलविण्याची साधी तसदीदेखील पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी घेतली नाही. पक्षाकडून मिळणार्‍या अशा वागणुकीमुळे ते व्यथित आहेत; मात्र त्यांनी राजकीय भूमिका बदलली नाही वा नाराजी कोठेही व्यक्त केली नाही. या पार्श्‍वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची भेट झाली.

 
याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, रवींद्र चव्हाण यांची मी भेट घेतली; मात्र पक्षप्रवेश किंवा अन्य कोणताही शब्द त्यांना दिलेला नाही. शिवसेनेनेही मला भरभरून दिले; मात्र काही गोष्टी फार वेदना देणार्‍या आहेत. त्यामुळे सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. वेळ आल्यावर माझी भूमिका स्पष्ट करेन.

हेही वाचा- तब्बल 19 वर्षांनी आलेला हॉलोवीन मून पाहा अन्‌ अनुभवा -

पक्षाला त्यांचा विसर पडला

शहरातील लाला कॉम्प्लेक्सपासून गोगटे कॉलेजपर्यंत फुटपाथला रेलिंगचा पहिला प्रकल्प राहुल पंडित यांच्या पुढाकाराने झाला; मात्र त्याच्या उद्घाटनाला सेनेला त्यांचा विसर पडला. स्मितल पावसकर यांच्या वॉर्डमध्ये सुसज्ज उद्यान उभारण्यासाठी राहुल पंडित यांच्या प्रयत्नाने निधी मिळाला. परंतु त्याच्या उद्घाटनालाही त्यांना डावलले. राहुल पंडित यांच्या वॉर्डामध्ये पक्षांतर्गत बैठका झाल्या. तेव्हाही पक्षाला त्यांचा विसर पडला होता, हे कार्यकर्त्यांना जाणवत होते.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former mayor rahul pandit I have not given any word speak