आता माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला ठोकणार रामराम!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

भास्कर जाधव यांनी 1982 मध्ये शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1995 ते 2004 काळात त्यांनी चिपळूणमधून दोन वेळा आमदार होण्याचा मान मिळविला.

रत्नागिरी : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार आणि नेते मंडळींची भरती सुरू आहे. त्यामुळे दररोज कुणीतरी या पक्षातून त्या पक्षात जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष विद्यमान आमदार भास्कर जाधव येत्या दोन दिवसात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुहागर येथे झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा बैठकीत त्यांनी हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नसल्याचे प्रामुख्याने सांगितले. त्यामुळे जाधव शिवसेनेत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले. 

जे सोबत येतील त्यांच्या सोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी न ठेवता हा पक्षप्रवेश होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीला कोकणात मोठे खिंडार पडणार हे स्पष्ट झाले आहे. 

भास्कर जाधव यांच्याविषयी 
भास्कर जाधव यांनी 1982 मध्ये शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1995 ते 2004 काळात त्यांनी चिपळूणमधून दोन वेळा आमदार होण्याचा मान मिळविला. छोटी-मोठी पदे भूषविल्यानंतर त्यांनी 2004 ला शिवसेनेतून काढता पाय घेतला. 

अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या जाधवांना 2004 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेत 2009 ला झालेल्या निवडणुकीत सेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना पराभूत केले. भास्कर जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि आघाडी सरकारमध्ये नऊ खाती सांभाळत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former state president will leave NCP