कुणबी समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी क्रांती संघटनेची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

कुणबी समाजातील वंचित घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कुणबी समाज क्रांती संघटनेची स्थापना केली. पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

रत्नागिरी - स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही कुणबी समाज विकासापासून वंचित आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढली पाहिजे. समाजाच्या समस्यांच्या शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याचे प्रतिपादन किसान को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम घवाळी यांनी केले. 

कुणबी समाजातील वंचित घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कुणबी समाज क्रांती संघटनेची स्थापना केली. पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेविका श्रद्धा कळंबटे, नगरसेविका प्रणाली रायकर, अनंत नैकर, शांताराम कळंबटे, लाडे आदी उपस्थित होते.संघटनेच्या अध्यक्षपदी सलील डाफळे, उपाध्यक्षपदी मिलींद हातफळे आणि मदन मांडवकर, सचिव मनोज आलीम, महिला सचिव निशा आलीम, सहसचिव रत्नदीप कुळ्ये, खजिनदार प्रवीण आंबेकर, माध्यम प्रतिनिधी विशाल मोरे, ई-संघटक प्रतिनिधी तुषार कांबळे आणि संदेश भिसे यांची एकमताने निवड करण्यात आली. 25 जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. 

श्रद्धा कळंबटे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील कुणबी समाज आजही हलाखीचे जीवन जगत आहे. नूतन कार्यकारिणीने वाडी-वस्तीवर जाऊन त्यांच्या गरजा आणि समस्या यांची माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foundation of Kunbi Community Kranti organisation