चिपळूणात 91 हजारांचा साडेचार किलो गांजा जप्त

मुझफ्फर खान
Sunday, 18 October 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद असल्या तरी अमलीपदार्थांचा धंदा जोरात सुरू आहे.

चिपळूण : सावर्डे अडरेकर मोहल्ला येथील एका तरूणाकडे तब्बल 91 हजार रुपयांचा साडेचार किलो गांजा पोलिसांना आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावर्डे पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत हा गांजा जप्त करून संबंधित तरूणाला ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - राज्यातील ५० आरागिरण्या अडचणीत -

चिपळूण, सावर्डे व अलोरे - शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमलीपदार्थांची बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार येथील नागरिकांकडून केली जात आहे. सावर्डे हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असल्यामुळे येथे राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तरूण शिक्षणाच्या निमित्ताने येथे येत आहेत. त्यांना अमलीपदार्थांच्या विळख्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद असल्या तरी अमलीपदार्थांचा धंदा जोरात सुरू आहे.

सावर्डे अडरेकर मोहल्ला येथील गुलाम महामुद काद्री हा तरूण अंमली पदार्थांची बेकायदा आणि विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एल. पाटील, पोलिस निरिक्षक हेमंतकुमार शाह आपल्या कर्मचार्‍यांना घेवून आज सकाळी सावर्डे येथे आले. 

हेही वाचा - शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊ ; भास्कर जाधवांनी केले आवाहन -

काद्री राहत असलेल्या घरावर छापा मारला असता त्याच्याकडे 4, 525 किलो वजनाचा 90 हजार 500 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. अमली पदार्थ बेकायदा बाळगल्याप्रकरणी काद्री याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक चंद्रकांत लाड करीत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four and half kilo drugs are found by police from youth in chiplun ratnagiri