Gram Panchayat Elections : चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणार अटीतटीची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

four Gram Panchayat Election 1 unopposed 83 candidates for 52 seats ratnagiri politics

Gram Panchayat Elections : चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणार अटीतटीची लढत

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, चिंद्रावले, वेळंब व परचुरी या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांच्या ४७ जागांसाठी ७२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले, तर सरपंचपदाच्या ५ जागांसाठी ११ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. परचुरीतील ग्रामस्थांनी जनतेतून थेट निवडून द्यायच्या सरपंचासह ७ ग्रामपंचायत सदस्यांना बिनविरोध निवडून दिले आहे. वेळंब ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.

अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी २२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण असून यासाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी नामाप्र स्त्री आरक्षण असून यासाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. चिंद्रावळे ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी नामाप्र स्त्री आरक्षण असून २ अर्ज दाखल झाले आहेत.

वेळंब ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांसाठी ९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून ही ग्रामपंचायत बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे; मात्र सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून त्यासाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. परचुरी ग्रामपंचायतीमध्ये ७ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, ही ग्रामपंचायत बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून त्यासाठी एकच अर्ज आल्याने ही जागाही बिनविरोध होणार आहे.