पर्स लांबवणारी महिलांची टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

एक नजर

  • एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक. 
  • टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय
  • आरती चरण चौगुले (वय २५), वनिता कुमार चौगुले (२२), मंदा सागर सकट (२६) आणि सुलोचना शशिकांत चौगुले (४०, सर्व रा. शिरोली नाका कोल्हापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे. 

कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती चरण चौगुले (वय २५), वनिता कुमार चौगुले (२२), मंदा सागर सकट (२६) आणि सुलोचना शशिकांत चौगुले (४०, सर्व रा. शिरोली नाका कोल्हापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिलेली माहिती अशी - अनुश्री विशाल जाधव (२७, रा. उंडील) पती विशाल जाधव यांच्यासह उंडील येथून कासार्डे येथे येण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे खांद्यावर पर्स होती. पर्समध्ये पाकीट होते. पाकिटात एका दागिन्यांची छोटी पिशवी होती. त्यात चार हजार रुपये होते. तळेरे येथे फोंडा बसमध्ये सकाळी नऊच्या सुमारास बसल्या. बसमध्ये चढत असताना तीन महिला पाठीमागून चढल्या. त्यांतील एकीने मोठ्या पिशवीची चेन काढून आतील पैशाचे पाकीट चोरले. बसमध्ये बसल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच अनुश्री चोर चोर म्हणून ओरडल्या. यावेळी चारही संशयित महिला बसमधून खाली उतरल्या. त्यामुळे प्रवाशांना संशय आला. प्रवाशांनी त्यांना पकडले. घटनास्थळी पोलिस पथकही दाखल झाले. तपासणी केली असता त्यांच्याकडे पैशाचे पाकीट सापडले.

वास्तव्य पालीमध्ये
यापूर्वी कणकवली-मालवण बसमध्ये एका महिलेची पर्स कणकवली बसस्थानकात १२ मेस चोरीस गेली होती. या चोरीमध्येही यांतील एका महिलेचा हात होता. त्या महिलेचीही फिर्यादीने ओळख पटविली आहे. या सर्व महिला सध्या पाली येथे राहतात. बसस्टॅण्डवर टिकल्या, फणी यांची विक्री करून गाडीत चढताना चोरी करतात, असे तपासात निष्पन्न झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four women arrested in purse robbery case