बांबुळी ग्रामपंचायतीत गैरव्यवहार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार झाली होती. त्या अनुषंगाने बांबुळी ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. याची रितसर चौकशी करण्यात आली असून यात लाखोंनी रूपये ग्रामसेवकाने हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. गटविकास अधिकारी स्तरावरून प्राप्त झालेला हा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्याकडे कारवाईसाठी सादर केला आहे. या प्रकाराने कुडाळ तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार झाली होती. त्या अनुषंगाने बांबुळी ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला देण्यात आला. या अहवालात बांबुळी ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चात अनियमितता आढळून आली आहे. जबाबदार व्यक्तींनी विकासकामांवर यातील निधी खर्च न करता परस्पर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ही रक्कम 10 ते 15 लाख रुपयांच्या घरात असल्याचे या चौकशी अहवालात नमूद केले आहे. कोणतीही विकासकामे न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी काढल्याने खळबळ उडाली आहे. या चौकशी अहवालात ग्रामसेवकाला दोषी धरले आहे. 

सरपंच सुद्धा अडचणीत ? 

ग्रामपंचायतीचा व्यवहार हा सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चालतो. गटविकास अधिकारी स्तरावर केलेल्या चौकशीत बांबुळी ग्रामसेवकावर या भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्‍चित केली आहे; परंतु चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा धनादेश काढताना सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त स्वाक्षरी आवश्‍यक असते. त्यामुळे या नियमाने ग्रामसेवकासोबत तत्कालीन सरपंच सुद्धा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

खाते सील करण्याचे आदेश 

जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यात अनियमितता आढळली. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने कुडाळ पंचायत समितीला आदेश देत बांबुळी ग्रामपंचायतचे चौदावा वित्त आयोग बॅंक खाते तात्काळ सील करण्याचे सांगितले आहे. 

चौकशीचा अहवाल सीईओंकडे सुपूर्त 

बांबुळी ग्रामपंचायत चौकशी अहवाल प्राप्त झाला का ? अशी विचारणा ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांना विचारले असता त्यांनी अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगितले. यात अनियमितता असल्याचेही मान्य केले. प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंद करीत कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्याकडे अहवाल सुपुर्द केल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud In Bambuli Grampanchayat Sindhudurg Marathi News