esakal |  कर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला लाखाचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud of youth under the pretext of lending

16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अमोल याची ही फसवणूक झाली आहे.

 कर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला लाखाचा गंडा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - बजाज फिनसर्वेमधून वैयक्तिक कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला तब्बल एक लाख आठ हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयिताने कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


तालुक्यातील खालची गोताडवाडी खालगाव जाकादेवी येथे राहणार्‍या अमोल रघुनाथ गोताड (वय 32) याने अंशुमन साहू नामक संशयिता विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अमोल याची ही फसवणूक झाली आहे. यातील संशयित साहू याने अमोल याला बजाज फिनसर्वेचे नावाने पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) मंजूर करून देतो, असे खोटे आमिष दाखवले. तक्रारदार आणि संशयित यांच्यात त्यानुसार वारंवार मोबाईलवरून बोलणे होत होते. प्रोसेसिंग फी म्हणून संशयिताने फोन करून 1 लाख 08 हजार 610 रुपये टप्प्याटप्याने ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर करण्यास सांगितले. फिर्यादी अमोल याने रक्कम ट्रान्स्फर केली. मात्र तरी कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर झाले नाही. याबाबत त्याने संशयिताकडे तगादा लावला. मात्र त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचाराजापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

ऑनलाइन फसवणुकीद्वारे होणार्‍या सायबर गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी पोलिस विविध उपक्रम हाती घेत आहेत. त्याद्वारे आपल्या बँक खात्याचे किंवा एटीएम कार्डचे इत्थंभूत माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असे स्पष्ट केले आहे. तरी काही आमिषांना बळी पडून लोक आपल्या बँक खात्यासंदर्भात माहिती देतात आणि फसगत होत आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image