esakal | राजापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain in ratnagiri rajapur

तालुक्याच्या ग्रामीण भागातील शीळ-गोठणे, दोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता पाण्याखाली गेला होता

राजापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर - परतीच्या वादळी पावसाने तालुक्यात धूमाकूळ घातला आहे. काल रात्रीपासून सतत पडणार्‍या पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला. वेगाने वाढणार्‍या पाण्याने 4 तासाच्या कालावधीमध्ये शहराला आज (ता.15) सकाळी वेढा घातला. जवाहरचौक परिसर सुमारे पाच फूट पुराच्या पाण्याखाली गेला. घुसणार्‍या पाण्याने बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या मनामध्ये चांगलीच धडकी भरविली. दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविताना त्यांची तारांबळ उडाली.


तालुक्याच्या ग्रामीण भागातील शीळ-गोठणे, दोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच ठप्प झाली होती. अर्जुना-कोदवली नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, उन्हाळे, गोवळ आदी गावांमधील उरली-सुरलेली भातशेती पाण्याखाली गेली होती. काही शेतांमध्ये कापणी केलेले भात पुराच्या पाण्यासोबत वाहून जातानाचे चित्र दिसत होते. 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. काल रात्रभर सततधार पाऊस होता. आज सकाळी बाजारपेठेतील दुकाने उघडण्यापूर्वी जवाहरचौकातील टपर्‍या पाण्याखाली गेल्या होत्या. नद्यांच्या वेगाने वाढणारे पाणी आणि त्याला पावसाचा जोर कायम असल्याने पूर येण्याची चाहूल पहाटे लागली होती. सकाळी 11 च्या सुमारास अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. पुराच्या पाण्याने काही तासाच्या कालावधीमध्ये जवाहर चौकामध्ये धडक दिली. त्यातच, बाजारपेठेमध्येही पूराचे पाणी घुसले. कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथ मार्गावरील टपर्‍या, दुकाने, कोंढेतड आणि वैशपायंन पूल, बंदधक्का आणि वरचीपेठ परिसर पूराच्या पाण्याखाली गेला आहे. व्यापारी आधीच सतर्क झाले होते. पूरस्थितीचा अंदाज घेवून काहींनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. या पूरस्थितीमुळे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेने भोंगा वाजवून सार्‍यांना संभाव्य पूरस्थितीबाबत सतर्कततेचा इशारा दिला. 

हे पण वाचामराठा आरक्षणासाठी लाल महाल ते लाल किल्ला आंदोलन छेडणार ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

दरम्यान, तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, पालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर आदींनी पूरस्थितीची पाहणी करून सार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे