esakal | एसटी महामंडळ विकणार इंधन
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel to be sold by ST Corporation

ॲड. अनिल परब; जिल्ह्यातील दोन पेट्रोल पंपांवर सुविधा, खासगीकरण होऊ देणार नाही

एसटी महामंडळ विकणार इंधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : एसटीचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी ट्रॅफिक (वाहतूक) प्लॅन बदलण्याची गरज आहे. म्हणून आता माल वाहतूक, टायर रिमोल्डिंगबरोबर खासगी वाहनांची बांधणी, एसटी सोडून अन्य वाहनांना डिझेल, पेट्रोल देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ३० पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील २ पेट्रोल पंपांचा समावेश आहे. अपुऱ्या प्रवाशांमुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे; मात्र एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे स्पष्ट मत एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केले. 


हेही वाचा- कोकणात दहावी, बारावी पुरवणी परीक्षा सुरू; बारावी, दहावीसाठी प्रत्येकी दोन केंद्र -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम आदी उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यात एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. कोरोनामुळे तोट्यात आणखी भर पडली आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी व्हावी, यासाठी आम्ही हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यातून कर्मचाऱ्यांचा पगार, डिझेल आदी प्राथमिक गरजा पूर्ण करता येणार आहेत.

दिवसेंदिवस वाढणारा तोटा भरून काढण्यासाठी तीन हजार गाड्या माल वाहतुकीसाठी काढल्या आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीचे अनेक पेट्रोल पंप आहे. त्यामध्ये फक्त एसटीच्या गाड्यांना डिझेल दिले जात होते; मात्र आम्ही प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३० पेट्रोल पंपांवर खासगी गाड्यांनाही डिझेल, पेट्रोल वितरित करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील दोन पेट्रोल पंपांचा समावेश आहे. 
एसटीच्या ताफ्यात सीएनजी, इलेक्‍ट्रॉनिक गाड्या
एसटीचा तोटा कमी करण्यासाठी महामंडळ वेगवेगळे प्रयोग करीत आहे. भारमान घटत चालल्याने डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी किंवा इलेक्‍ट्रॉनिक गाड्या मंडळाच्या ताफ्यात आणण्याचा महामंडळाचा विचार आहे, असे परब यांनी सांगितले. 

खासगी वाहनांच्या बांधणीचे कामही..
एसटीची स्वतंत्र टायर रिमोल्ड कंपनी आहे. यामध्ये आतापर्यंत फक्त एसटीचे टायर रिमोल्डिंग केले जात होते; मात्र आता बाहेरच्या कंपन्यांचे टायरही रिमोल्डिंग केले जाईल. एसटीच्या विविध आगारामध्ये गाड्यांची बांधणी केली जाते. या आगारांमध्ये आता एसटीबरोबरच खासगी वाहनांच्या बांधणीचे काम एसटी घेणार आहे.

संपादन - अर्चना बनगे