esakal | गडनदीच्या पुरात `ही` बाजारपेठ पाण्याखाली 
sakal

बोलून बातमी शोधा

Gad River Flood Water Enters In Makhajan Market

तालुक्‍यात गेल्या 24 तासांत 100 पेक्षा अधिक मिमी. पाऊस कोसळला आहे. शुक्रवारपासून आत्तापर्यंत पावसाने 250 मिमी.ची सरासरी गाठली आहे. शनिवारी पावसाने जोर लावला. हा जोर दिवसभर कायम असल्याने गड नदीला पूर आला.

गडनदीच्या पुरात `ही` बाजारपेठ पाण्याखाली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - संगमेश्‍वर तालुक्‍यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे. गड नदीला पूर येऊन पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. यावर्षी सलग तिसऱ्यांदा माखजनला पुराचा तडाखा बसला आहे. 

तालुक्‍यात गेल्या 24 तासांत 100 पेक्षा अधिक मिमी. पाऊस कोसळला आहे. शुक्रवारपासून आत्तापर्यंत पावसाने 250 मिमी.ची सरासरी गाठली आहे. शनिवारी पावसाने जोर लावला. हा जोर दिवसभर कायम असल्याने गड नदीला पूर आला.

त्यामुळे नदीकिनारी असलेल्या माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ सतर्क होते. त्यामुळे पाणी काठाबाहेर येऊ लागताच सर्वांनी सामान सुरक्षित स्थळी हलवले. शनिवारी रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे बाजारपेठेतील पाणी तसेच होते. आज सकाळी 11 वाजेपर्यंतही बाजारपेठेत पाणी कायम असल्याने बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. गड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यात यावर्षी सलग तीन वेळा पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. 

पावसाचा जोर कायम असल्याने शास्त्री, सोनवी, सप्तलिंगी, बावनदी, काजळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्या अद्यापही धोक्‍याच्या पातळीखालीच असल्याने इतर बाजारपेठा सुरक्षित आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.  

loading image