गांधी चौकातील पहिले ध्वजवंदन

- सचिन माळी
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मंडणगडची कथा - साने गुरुजींकडून झाले हाेते नामकरण

मंडणगडची कथा - साने गुरुजींकडून झाले हाेते नामकरण

मंडणगड - १५ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी मुंबईतील गोवालिया टॅंक येथे इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्यानंतर गांधीजींच्या अनुयायांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतात जाऊन जनजागृती करून लोकांच्या मनात देशभक्ती निर्माण करण्याचे काम केले. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास प्रवृत्त केले. साने गुरुजी यांच्याकडे कोकणात हे काम देण्यात आले होते. गुरुजी मूळचे कोकणातले दापोली-पालगड येथील. ते मंडणगडमध्ये आले. कोकणातील मंडणगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गांधी चौक येथे मारुती मंदिरासमोरील चौथऱ्यावर साने गुरुजींचे अत्यंत भावोत्कट भाषण झाले. त्यानंतर मंदिरात उपस्थितांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्याबरोबर कोकणचे दुसरे गांधी आप्पासाहेब पटवर्धन उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन स्थानिक नेते पुरुषोत्तम शेठ यांनी केले. त्याचवेळी साने गुरुजींच्या हस्ते या चौकाचे नामकरण गांधी चौक म्हणून करण्यात आले. त्यावेळी मंडणगडला पेठा म्हणायचे. गांधी चौक ही त्याची बाजारपेठ होती. गांधी चौक हेच मूळचे मंडणगड होते. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी मंडणगड तालुक्‍याचे सर्वप्रथम ध्वजवंदन हे गांधी चौक येथील साने गुरुजी यांनी भाषण दिलेल्या ठिकाणी त्याच चौथऱ्यावर करण्यात आले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी गांधी चौकाला आहे. ९ ऑगस्टदरम्यान साने गुरुजी गांधी चौक येथे आले होते. त्यानंतर ते पालगड, खेड, दापोली असा प्रवास करीत दौऱ्यावर निघून गेले. त्याच दरम्यान त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी गुरुजी, विनोबा एकत्र होते. १९५६ ला मंडणगड ग्रामपंचायत स्थापन झाली. गुरुजींच्या आणि अाप्पासाहेब पटवर्धन यांच्या सान्निध्यात राहिलेले पुरुषोत्तम सुंदर शेठ हे पहिले सरपंच झाले. 

१९५६ ते १९६६ या दहा वर्षांच्या कालावधीत ते सरपंच राहिले. दरम्यानच्या काळात परळ येथील कार्यालयात त्यांची पुनर्भेट साने गुरुजींशी झाली. महात्मा गांधींनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात ते आचरणात आणण्यासाठी अाप्पासाहेब पटवर्धन हे स्वतःचा व्यवसाय सोडून कोकणातील गोपुरी येथे आले आणि आश्रमाची स्थापना त्यांनी केली. साने गुरुजींच्या बरोबरीने व गांधीजींच्या प्रेरणेने कोकणात अशी संस्थात्मक कामे झाली. आजही आपल्या प्रजासत्ताकात या संस्था उत्तम काम करीत आहेत.

‘‘भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जनजागृतीसाठी गांधी चौक येथे साने गुरुजी यांचे भाषण झाले. अशी गांधी चौकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साने गुरुजी आणि अाप्पासाहेब पटवर्धन यांसारखे महापुरुष या ठिकाणी आले हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे.’’

- मि. प्र. तथा बापू शेठ, लेखक व गांधीवादी कार्यकर्ते, मंडणगड

Web Title: gandhi chowk flag bow