esakal | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्यांसाठी नियमावली : बांद्यात ७ ऑगस्टपर्यंतच प्रवेश....सविस्तर वाचा....
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh festival Preparation Decision to set up separate committees in each village in bandha

 ३१ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन....

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्यांसाठी नियमावली : बांद्यात ७ ऑगस्टपर्यंतच प्रवेश....सविस्तर वाचा....

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : गणेश चतुर्थीसाठी शहरात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय कोरोना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ७ ऑगस्टपर्यंत शहरात प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी चाकरमान्यांच्या नातेवाईकांनी येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी ३१ जुलैपर्यंत ग्रामपंचायतीत करावी, असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश चतुर्थी सणाचे नियोजन करण्यासाठी कोरोना कृती समिती, येथील ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, व्यापारी संघ, विविध मंडळांचे अध्यक्ष व ग्रामस्थांची विशेष बैठक ग्रामपंचायत सभागृहात झाली. सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्‍वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मकरंद तोरस्कर, श्‍यामसुंदर मांजरेकर, जावेद खतीब, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, राजेश विरनोडकर, अंकिता देसाई, समीक्षा सावंत, तलाठी वर्षा नाडकर्णी, मनीष शिंदे, देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, ग्रामसेवक डी. एस. अमृतसागर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, बांदा सोसायटी सचिव लाडू भाईप, आरोग्यसेवक राजन गवस, कृषी सहाय्यक आर. ए. वसकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, सर्वेश गोवेकर, भाऊ वाळके, मंगलदास साळगावकर, राजा सावंत, प्रीतम हरमलकर, ज्ञानेश्वर सावंत, हेमंत दाभोलकर, आबा धारगळकर, सावली कामत, नंदू कल्याणकर, अशोक सावंत, राकेश केसरकर आदी 
उपस्थित होते.

हेही वाचा- सात दिवस क्‍वारंटाईन धोकादायक : डॉक्‍टरांनी दिल्या या सूचना -


बांदा मोठे असल्याने शहरात येणाऱ्या चाकरमान्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाडीत स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. यामध्ये तेथील ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक तरुणांचा समावेश केला आहे. कंटेन्मेंट झोन करताना मर्यादित करावा, जेणेकरून त्याचा परिणाम बाजारपेठेवर होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.


गणेश चतुर्थी कालावधीत माटोळी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा बाजार गांधीचौक, कट्टा कॉर्नर, आळवाडी मैदान येथे विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर ठेवावे व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. शहरात रुग्ण आढळल्यास कंटेन्मेंट झोन कसा असेल याबाबत चर्चा करण्यात आली. शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पोलिसांची मदत घेऊन ग्रामपंचायत कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले. 

हेही वाचा- दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी... -

गणेशोत्सवाबाबत सूचना
शासनाच्या नियमानुसार शक्‍य असल्यास गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करावे, तशी सोय नसल्यास नदीवर किंवा ओहोळवर विसर्जन करण्यासाठी गणपतीबरोबर घरातील दोन व्यक्तींनाच परवानगी असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. क्वारंटाईनसाठी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. सीमा तपासणी नाका येथील निवासी इमारतीतही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 

हेही वाचा-त्यामुळे आल्या सिंधुदुर्गातील या प्रसिध्द दोन नद्या चर्चेत.... -


प्रत्येकाने काळजी घ्या
शहरात कोरोनाबाधित सापडलेल्या तरुणाचे वडील हे सोसायटीत कर्मचारी असल्याने सोसायटी बंद ठेवली आहे. मात्र. सोसायटीने यावर तोडगा काढत लोकांना तत्काळ मोफत धान्य वितरित करण्याच्या सूचना उपसभापती राऊळ यांनी सोसायटीचे सचिव श्री. भाईप यांना दिल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग न होता निर्धोकपणे उत्सव साजरा करण्याचे आवाहन सरपंच खान यांनी या वेळी केले.

संपादन - अर्चना बनगे