कोकणातील ग्रामपंचायतीचे चाकरमान्यांसाठी नियम : मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत धाडले निरोप...

राजेश कळंबटे
Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ग्रामपंचायतीनी घेतला  निर्णय....

रत्नागिरी :  गणेशोत्सावाला कोकणात हजारो चाकरमानी दाखल होणार आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यातून संक्रमण होण्याची भिती ग्रामस्थांमध्ये आहे. गावातील लोकांमध्ये संक्रमण होऊ नये यासाठी क्वारंटाईनचा कालावधी चौदा दिवसांचा रहावा अशी तयारी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी सुरु केली आहे. त्यादृष्टीने गावातील लोकांची मानसिकता तयार करण्यावरही भर दिला जात आहे.

गणेशोत्सावात कोकणातील गावी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी सरकारतर्फे एसटी सेवा सुरु करण्यात येणार आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ग्रामपंचायती देखील चाकरमान्यांसाठी नियम आखण्यासाठी सरसावल्या आहेत. येणार्‍या चाकरमान्यांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत झाले आहे. तसेच ठराव किंवा आवाहन विविध ग्रामपंचायतीकडून करण्यास सुरवात झाली आहे. मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत निरोपही धाडले जात आहेत. रत्नागिरीतील वरवडे, नाखरे या ग्रामपंचायतींनी चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा- भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण : नियमांत राहून जपणार नामसप्ताहाची परंपरा... -
गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांनी चौदा दिवस अगोदर यावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट पाहून हा निर्णय घेतल्याचे येथील सरपंचांनी स्पष्ट केले. 5 ऑगस्टनंतर गावी न आल्यास कोणत्याही प्रकारचा दंड मात्र आकारला जाणार नाही. पण येणार्‍या चाकरमान्यांनी सर्व काळजी घ्यावी, असा पवित्रा येथील लोकांनी घेतला आहे. सरकारने क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा केल्यास ग्राम कृतीदल गावाच्या सुरक्षिततेसाठी अंमलबजावणी करताना गावातील लोकांची मानसिकता बनविली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अशाच प्रकारचं चित्र दिसून येत आहे. सिंधुदुर्गमध्ये सरपंच संघटनेकडून तसे निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा- खरे आकडे लपावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे मागितली हजारो कोटींची मदत : निलेश राणे यांनी समोर आणली वस्तुस्थिती -

चाकरमानी गावी आल्यानंतर त्यांना रिकाम्या घरासह शाळांमध्ये क्वारंटाईनसाठी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. क्वारंटाईन कालावधी चौदा दिवस राहणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तरीही आरोग्यची काळजी घेऊन चाकरमान्यांचे स्वागत केले जाणार आहे.

- विजय चव्हाण, सरपंच

 

गणेशोत्सवासाठी वरवडे गावात बाहेरुन येणार्‍या लोकांचा सर्व्हे केला आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता आरोग्यच्या सुरक्षिततेसाठी क्वारंटाईन कालावधी अधिक असला पाहीजे. चाकरमान्यांच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत.

- निखिल बोरकर, सरपंच, वरवडे

हेही वाचा- सिंधुदुर्गात  बुधवारची सकाळ  चार  कोरोना बाधित रुग्णांनी... -

क्वारंटाईन कालावधीवरुन गावागावामध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही मुंबईकरांनी गणेशोत्सवात मुंबईतच राहण्याची मानसिकता केल्याचे चित्र आहे. शहरातच छोटी मुर्ती आणून पुजन करण्याची तयारी केली आहे. या माध्यमातून नवीन विचार पुढे येत आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival Rules for the konkani people of the Gram Panchayat in Konkan