एसटीच्या देखाव्यातून केले समाजप्रबोधन; वाचा सविस्तर

रवींद्र साळवी
Thursday, 27 August 2020

एसटी या आर्थिक संकटातून बाहेर पडावी आणि पुन्हा एकदा प्रवाशांची संख्या वाढत जाऊन फायद्यात यावी ही अपेक्षा ठेवून हा देखावा तयार करण्यात आला आहे

लांजा : कोरोनाचे राज्यात संक्रमण सुरू झाल्यानंतर गोरगरीब जनतेची नाळ जुळलेल्या एसटीला मोठा फटका बसला. मार्चपासून तर आतापर्यंत एसटी पूर्ण तोट्यात चालली आहे. मात्र  तोट्यात चाललेली पुन्हा रुळावर येण्यासाठी गणपती बाप्पाने हे कोरोनचे संकट दूर करावे अशी अपेक्षा धरून चक्क एसटीचा देखावा तयार करून एसटी बद्दल आत्मियता प्रवाशी मित्र हर्षद तोडणकर यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा...

प्रतिवर्षाप्रमाणे कोकणामध्ये घरगुती गणपती उत्सव मोठया उत्साहात संपन्न होत असतो. प्रत्येक घरात गणेश मूर्तीची स्थापना करून कोकणात गणपती उत्सवाचा आनंद लुटला जातो. प्रत्येक जण आपआपल्या घरात वेगळ्या प्रकारची सजावट आणि देखावे करत असतात. लांजा तालुक्यातील हर्चे -  शेळवी गावातील एसटी प्रेमी प्रवाशीमित्र हर्षद तोडणकर यांनी यावर्षी आपल्या घरी गणरायाच्या सजावटी करीता एसटीच्या पुढील दर्शनी बाजूची प्रतिकृती साकारली आहे. 

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे.  त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी हर्षद तोडणकर यांनी प्रत्यक्षात गणरायाच्या चरणी सजावटीच्या माध्यमातून शासनाने केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचे पालन करण्यासाठी सर्व नागरिकांना सहकार्यचे आवाहन केलं आहे.  तसेच एस टी प्रेमी, प्रवाशी मित्रांना गणरायाच्या चरणी एसटी  सेवा पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी प्रार्थनाही केली. यामुळे एसटी कर्मचारी वर्ग, प्रवाशी यांच्याकडून हर्षद तोंडणकर यांचे अभिनंदन होत आहे.

हेही वाचा -  परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती...

मार्च महिन्यात लॉक डाऊन झाल्यानंतर मुंबईत खाजगी कंपनीत नोकरीत असलेले हर्षद तोडनकर हे आपल्या हर्चे गावी आले. कोरोनामुळे एसटी अडचणीत सापडली आहे.  एसटी या आर्थिक संकटातून बाहेर पडावी आणि पुन्हा एकदा प्रवाशांची संख्या वाढत जाऊन फायद्यात यावी ही अपेक्षा ठेवून हा देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यासाठी त्यांनी पंधरा दिवस मेहनत घेतली आहे. देखाव्यासाठी बांबू , पुट्टा याचा वापर करण्यात आला आहे.

दरवर्षी गणपतीसाठी येणारे तोडणकर हे अल्प कालावधीत देखावा तयार करतात, मात्र यावेळी त्यांना पुरेसा वेळ भेटल्याने सामाजिक संदेश देणारा देखावा त्यांनी तयार केला. या देखाव्यासाठी त्यांचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival special decoration design of ST in ratnagiri express love about ST buses