esakal | सिंधुदुर्ग किल्ल्यासह मालवणात `येथे` श्री ची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Pujan On Sindhudurg Fort Marathi News

हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्त्या घरी नेण्यास सुरवात केली होती. शासनाचे नियम पाळत कोणतीही मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने भाविक गणपती हातगाड्या, रिक्षा टेम्पोमधून नेत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यासह मालवणात `येथे` श्री ची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालवण -  विघ्नहर्त्या गणरायाची आज तालुक्‍यात घरोघरी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या सर्व बंधनांचे काटेकोरपणे पालन नागरिकांकडून करण्यात आल्याचे दिसून आले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. 

हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्त्या घरी नेण्यास सुरवात केली होती. शासनाचे नियम पाळत कोणतीही मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने भाविक गणपती हातगाड्या, रिक्षा टेम्पोमधून नेत होते. कोकणात श्री गणेशाची भटजींकडून विधिवत प्रतिष्ठापना केली जात होती; मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी यात खंड पडल्याचे दिसून आले. प्रशासनाने यावर्षी भाविकांनी स्वतः गणेशाची पूजा करावी किंवा ऑनलाईन पद्धतीने भटजींकडून पूजा करून घ्यावी, असे आवाहन केले होते; मात्र इंटरनेटची सुविधा सर्वच ठिकाणी चांगली नसल्याने हे शक्‍य झाले नाही. भाविकांना पूजा करताना समस्या भासू नये, यासाठी शहरातील भटजींनी भाविकांना घरपोच पूजेची सर्व माहिती असलेल्या पत्रकांचे वाटप केल्याचे दिसून आले. या पत्रकानुसार भाविकांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. 

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, आचरा रामेश्‍वर मंदिर, पोलिस ठाणे, मालवण बसस्थानक, भरड दत्तमंदिर, बाजारपेठ हनुमान मंदिर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणीही श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून नागरिकांना सामाजिक अंतर ठेवून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत होते. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.