३०० वर्षे परंपरेचा मौजे पालगडचा गणेशोत्सव आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dapoli

३०० वर्षे परंपरेचा मौजे पालगडचा गणेशोत्सव आजपासून

हर्णै : पालगड (ता. दापोली) गावी गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून भाद्रपद शुद्ध षष्ठीपर्यंत साजरा केला जातो. गजाननाच्या या उत्सवाला ३०० वर्षांहून जुनी परंपरा आहे. याला एक वेगळीच आख्यायिका आहे, अशी माहिती श्री देव गणपती आणि ब्राह्मण उत्सव मंडळ, पालगड ब्राह्मणवाडीचे सरपंच सुनील गोंधळेकर व सदस्यांनी दिली.

मौजे पालगड गावचे पूर्वीचे नाव पालील. या गावचे मूळचे खोत दळवी. त्यांना दोन मुली होत्या. त्यापैकी एक पवार कुटुंबाकडे तर एक बेलोसे कुटुंबाकडे लग्न होऊन गेलेल्या होत्या. बेलोसे कुटुंबातील हिरोजी बापूराव बेलोसे हे त्या काळी हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर अधिकारी होते. त्यांनी आसूद येथील वेदशास्त्र संपन्न विठ्ठल भट जोशी यांना नैमित्तिक धार्मिक कामांसाठी पालगड मुक्कामी स्थायिक होण्यासाठी आणले.

या विठ्ठल भट जोशी यांना गणपतीने स्वप्नात येऊन दर्शन देऊन वाटेवरील पिंपळाच्या झाडाखाली माझे स्थान आहे, त्याची तू स्थापना व सेवा कर, असे सांगितले. दृष्टांत प्रमाण मानून मूर्तीचा शोध घेतला, तेव्हा पिंपळ वृक्षाखाली जमिनीमध्ये श्री गजाननाची मूर्ती मिळाली. त्याच ठिकाणी घुमटी वजा देऊळ बांधून तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शके १७३३ म्हणजेच इ. स. १८११ पर्यंत उत्सवाचा टाचणवजा इतिहास (कै.) परशुराम बल्लाळ जोशी यांच्याकडे मिळाला. जोशी मंडळी सुरुवातीला तीन दिवस, तर कालांतराने पाच दिवस असा उत्सव साजरा करू लागले. इ. स. १८११ ते १८६० या सुमारे ५० वर्षांच्या काळात गवस बेलवाडीतून येऊन ही मंडळी आणि गावातील बाजारपेठ भागातील इतर पटवर्धन, केतकर, करमरकर आदी हा उत्सव साजरा करत होते. या काळात इंदूर संस्थानकडून काही वर्षासन म्हणून रक्कम मिळत असे. कालांतराने ती बंद झाली. इ. स. १८६१ ते १८९५ या ३५ वर्षांच्या काळात उत्सवाचे उत्पन्न वाढले. त्यामुळे उत्सवात चौघडा, कीर्तन, महाप्रसाद, पुरणपोळी असे बेत होऊ लागले. १८९५ मध्ये या वार्षिक उत्सवासंबंधी नियमावली देखील ठरवण्यात आली.

मुंबईचे गव्हर्नरच्या सही शिक्क्याची सनद

या गणपतीला १५ ऑगस्ट १९७४ ची वार्षिक रु. ७ ची सेक्रेटरी ऑफ स्टेट कौन्सिल यांच्यावतीने मुंबईचे गव्हर्नर यांचे सही शिक्क्यानिशीची सनद उपलब्ध आहे; मात्र ही रक्कम बऱ्याच वर्षात कोणीही आणल्याचे दिसून आलेले नाही. उत्सवात महापूजा, अभिषेक, सहस्त्रावर्तने, महानैवैद्य, आरती, मंत्रपुष्प, सहा दिवस रात्री कीर्तन व शेवटच्या दिवशी करमणुकीचे कार्यक्रम, लळिताचे कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात.

उत्सव भाद्रपदातच करावा असा कौल

हा उत्सव माघ महिन्यात घ्यावा म्हणून बरीच चर्चा झाली. पण, निर्णय घेण्यासाठी ग्रामस्थांनी श्री गजाननाच्या मूर्तीसमोर चिठ्ठ्या टाकल्या. उत्सव भाद्रपदातच करावा, असा कौल गजाननाने दिला, अशी आख्यायिका आहे. यंदा प्रतिपदेपासून म्हणजे मंगळवार (ता. ७)पासून उत्सव सुरू होत असून, आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री साडेबाराला जन्मकाळ साजरा होईल. त्यादिवशी कीर्तन, महाप्रसाद होणार असून, ते नियमातच होणार आहे. त्यामुळे उत्सव वाडी मर्यादितच होणार असून, कोरोनाचे शासनाने घालून दिलेली नियमावली पाळूनच साजरा केला जाईल.

Web Title: Ganeshotsav Of Mauje Palgad With 300 Years Of Tradition Started From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :palgad ganesh temple