esakal | यंदाही अंगारकीला गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाही अंगारकीला गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

यंदाही अंगारकीला गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे राज्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद आहेत. त्यामुळे मंगळवारी (27) अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रसिध्द श्री देव गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंतच्या दुसर्‍या अंगारकीला भक्तगण श्रींच्या दर्शनाला पारखेच राहणार आहेत.

अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी भक्तगणांची प्रचंड गर्दी होते; मात्र कोरोनामुळे मंगळवारी अंगारकी दिवशी मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार असल्याचे संस्थान श्री देव गणपतीपुळेतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्रात कोविड प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडूनही कोविड प्रतिबंधात्मक आदेश आलेले आहेत, ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांनी देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; तोतयाच्या आगमनामुळे उडाला गोंधळ

पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध राज्यातून अंगारकीच्या दिवशी भक्त येत असतात. कोरोनामुळे मागील दीड वर्षात सर्वच देवस्थाने दर्शनासाठी बंदच आहेत. या कालावधीतील दुसरी अंगारकी आहे. दुसर्‍या लाटेमध्ये गेली चार महिने गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंदच आहे. सध्या लाट ओसरत असली तरीही प्रशासनाकडून मंदिरांबाबत निर्णय झालेला नाही. दर्शनासाठी गणपतीपुळे अ‍ॅपवर ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

दरम्यान गणपतीपुळे परिसरात काही परजिल्ह्यातील पर्यटक येऊन जात आहेत. दिवसाला शंभरहून अधिक पर्यटकांची हजेरी लागते. ते कळस दर्शन घेऊन समुद्रकिनारी फिरुन माघारी परततात. गेल्या पाच दिवसात पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग बंद आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून येणार्‍यांसाठी कुंभार्लीचा पर्याय आहे. परंतु पुरस्थितीमुळे कळस दर्शनासाठी येणार्‍यांची संख्या अत्यंत कमी राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा: 'शासन पूरग्रस्तांच्या पाठी ठामपणे उभे, योग्य मदत केली जाईल'

चिपळूणवासीयांना देवस्थानचा मदतीचा हाथ

चिपळूण येथे जल प्रलयात बाधित झालेल्यांसाठी गणपतीपुळे देवस्थानकडून मदतीचा हाथ देण्यात येणार आहे. स्वच्छता आणि मदतीसाठी देवस्थानच्या 33 लोकांचे पथक सोमवारी (26) चिपळूणात रवाना झाले आहे. शंभर पाण्याचे बॉक्स आणि साहित्यही ते सोबत घेऊन गेले आहेत. तसेच दोन दिवसात बाधितांसाठी धान्य स्वरुपात 500 किट देवस्थानकडून पुरवण्यात येणार आहेत.

loading image
go to top