esakal | सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; तोतयाच्या आगमनामुळे उडाला गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; तोतयाच्या आगमनामुळे उडाला गोंधळ

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; तोतयाच्या आगमनामुळे उडाला गोंधळ

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी : निपाणकरांनी संस्थानचा ताबा घेतला त्या धांदलीत हत्या झालेल्या रामचंद्रराव उर्फ भाऊसाहेब यांचा तोतया दुर्गाबाईंच्या कारकिर्दीत सांतवाडीत दाखल झाला. यावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला. पुढे याचे गुढ उकलले. यानंतरच्या काळात दुर्गाबाईंचे निधन झाले. सत्तेच्या चाव्या खेमसावंत यांच्या पत्नी नर्मदाबाई आणि सावित्रीबाई यांच्याकडे आल्या. तरीही संस्थानातील सरदारांचा स्वैराचार सुरूच राहिल्याने इंग्रजांनी पुन्हा हस्तक्षेप केला.

निपाणकरांनी कोल्हापूरकरांचा पराभव करून स्वतःच सावंतवाडी संस्थानवर ताबा मिळवायचा प्रयत्न केल्याचे संदर्भ याआधी आले आहेत. या काळात गादीवर असलेले रावसाहेब यांचे पुत्र रामचंद्रराव उर्फ भाऊसाहेब यांची हत्या झाली होती; मात्र ती नेमकी कोणी केली याबाबत संभ्रम होता. याच भाऊसाहेबांचा तोतया सावंतवाडीत आला आणि आपणच भाऊसाहेब असल्याचा दावा करू लागल्याने एक विचित्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दुर्गाबाईंनी यातूनही मार्ग काढला. हा तोतया सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याचे आप्त असलेल्या पाटणमधील पाटणकर घराण्यातील काहींना घेऊन सावंतवाडीत दाखल झाला.

आपणच भाऊसाहेब असल्याचा त्याचा दावा होता. त्याच्या म्हणण्यानुसार निपाणकरांच्या कैदेत असताना भाऊसाहेबांच्या पहाऱ्यासाठी शेख हुसेन नावाचा अरब जमादार होता. या शेखची भाऊसाहेबांवर माया होती. यातच भाऊसाहेबांना ठार करण्याचा हुकुम झाल्याचे त्याला कळले. त्याने भाऊसाहेबांच्या चेहऱ्याचा दुसरा एक मुलगा आणून राजवाड्यात ठेवला. यानंतर भाऊसाहेबांना जवळच्या जंगलात नेवून त्यादिवशी ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी एका बैलावर बसून आणि सोबत एक-दोन माणसे देवून बेळगावात पाठवले. तेथे बैल विकून खर्चाला पैसे दिले. तेथून आपण नवलगुंदा येथे गेलो. पुढे गुर्लामसुरा येथे जावून तिथल्या दिक्षीत आडनावाच्या व्यक्तीकडे राहिलो. तिथून नरसोबाचीवाडी, मिरज, तासगाव असे फिरत विजापूरला गेलो.

हेही वाचा: कोल्हापूर - राधानगरी राज्यमार्ग बंद ; हळदी येथे रस्त्यावर पाणी

काही वर्षे ब्रह्मचारी वेश परिधान करून तेथेच काढले. पुढे पुणे, वाई असा फिरत पाटणला पोहोचलो. त्या ठिकाणी आपली आजी राजसबाई (रावसाहेब यांची आई) आणि चुलत आत्ये आकाबाई राहत होत्या हे माहिती होते. त्यांच्याकडे जावून राहिलो. तेथून चंद्रोबा सुभेदार आणि इतर मंडळींना पत्र पाठवली. त्यातून चंद्रोबा यांनी माणूस पाठवून खर्चाला २०० रूपये दिल्याचा दावा त्या तोतयाने केला. हा गुंता सोडवण्यासाठी दुर्गाबाईंनी चौकशी सुरू केली. राजघराण्याचे आप्त असलेल्या पाटणकर कुटुंबातील व्यक्ती त्या तोतयासोबत असल्याने या विषयाची तड लावणे गरजेचे बनले होते. दुर्गाबाईंनी भाऊसाहेबांची आई दादीबाई यांच्याकडे या तोतयाला परीक्षेसाठी पाठवले. यात तो भाऊसाहेब नसून तोतया असल्याचे सिद्ध झाले. अधिक चौकशी केल्यावर त्याची खरी ओळखही पटली.

पूर्वी फोंडसावंत उर्फ बाबासाहेब यांच्याकडे बाबी दुलसेठ तानवडा नावाचे व्यक्ती कामाला होते. त्यांचा हा मुलगा मुकुंद तानवडा असल्याचे स्पष्ट झाले. काही कारणाने तो येथून पळून गेला होता. सत्य समोर आल्यानंतर दुर्गाबाईंनी त्या तोतयाला शिक्षा देण्याचे ठरवले; मात्र पाटणकर मंडळींनी त्याला विरोध केला आणि आपल्या सोबत नेण्याचा निर्णय घेतला. यात रावसाहेबांच्या आई राजसबाई याही होत्या. या तोतयाला पाठवून देवून पाटणकर मंडळींनी काहीकाळ सावंतवाडीत थांबावे असे दुर्गाबाईंना वाटत होते; मात्र ते न ऐकता पाटणकर मंडळी तोतयाला घेवून पाटणला निघून गेले.

हेही वाचा: अजितदादा म्हणाले, ‘एवढा पाऊस पडला की..’

ब्रिटीशांनी हस्तक्षेप केला तरी संस्थानच्या सरदारांमधील स्वैराचार थांबण्याचे नाव घेत नव्हता. कित्येक सरदार हे किल्ले बळकावून बसले होते. संभाजी सावंत यांनी रेडीचा यशवंतगड, बाबणो गोपाळ यांनी निवती आणि चंद्रोबा सुभेदार यांनी बांद्याचा कोट ताब्यात ठेवला होता. ते सावंतवाडीकरांचा हुकुम मानेनासे झाले होते. याचा त्रास लोकांना होत होता. १८१२ मध्ये झालेल्या तहाप्रमाणे या स्थितीत यशवंतगड आणि निवती हे किल्ले सावंतवाडीकरांनी इंग्रजांच्या ताब्यात द्यावे असे पत्र मेजर जनरल सर विल्यम ग्रँट केर या अधिकाऱ्याने दुर्गाबाईंना पाठवले. याच दरम्यान दुर्गाबाई खूप आजारी होत्या. यातच १७ जानेवारी १८१९ ला त्यांचे निधन झाले. त्यामुळे केर यांच्या पत्राबाबत निर्णय झाला नाही.

दुर्गाबाईंच्या पश्‍चात खेम सावंत यांच्या उर्वरीत दोन पत्नी नर्मदाबाई आणि सावित्रीबाई कारभार पाहू लागले. १८१९ ला ब्रिटीशांनी निर्वाणीचे पाऊल उचलले. मेजर जनरल सर विल्यम ग्रँट केर हा संस्थानच्या हद्दीवर दाखल झाला. त्याने सावंतवाडीकरांकडे आपल्या अटी किंवा मागण्या मांडल्या. यात काही गुन्हेगारांना इंग्रजांच्या ताब्यात द्यावे, संभाजी सावंत आणि बाबणो गोपाळ या सरदारांना त्यांच्या अधिकारापासून दूर करावे. रेडी आणि निवती हे किल्ले पुढची तीन वर्षे इंग्रजांकडे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

सावंतवाडीच्या दरबाराने या मागण्या फेटाळल्या. तेव्हा मेजर जनरल केर याने सावंतवाडीकरांविरूद्ध लढाईची तयारी सुरू केली. यातही त्याने मुत्सदीपणा दाखवला. त्या काळात चंद्रोबा सुभेदार यांच्याकडे सैनिकी ताकद जास्त होती. त्यांनी चंद्रोबा यांना या लढाईत तटस्थ राहण्याचे आवाहन केले. तसे झाल्यास तुमची सत्ता आणि अधिकार ब्रिटीश सरकार कायम ठेवेल असे सांगितले. त्यामुळे सावंतवाडीकरांना सुभेदारांची मदत मिळाली नाही. यामुळे सावंतवाडीकर दोन्ही किल्ले ब्रिटीशांच्या ताब्यात द्यायला तयार झाले; मात्र किल्लेदार किल्ला सोडायला तयार होईना. अखेर मेजर केर याने प्रथम निवतीवर हल्ला केला आणि तो मिळवला. यानंतर रेडीच्या यशवंतगडाला वेढा दिला; मात्र बरेच दिवस आतील सैनिक दाद देईनात. शेवटी १३ फेब्रुवारी १८१९ ला इंग्रजांनी किल्ल्यावर तोफा डागायला सुरूवात केली. यामुळे आतील लोकांचा नाईलाज झाला. ते रात्रीच्यावेळी किल्ला सोडून निघून गेले. त्यामुळे ब्रिटीशांचा त्यावर ताबा आला.

हेही वाचा: 'पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार'

पुढे १७ फेब्रुवारी १८१९ ला सावंतवाडीचा दरबार आणि ब्रिटीश सरकार यांच्यात तह झाला. त्यात असे ठरले की संभाजी सावंत आणि बामणो गोपाळ यांना सावंतवाडीकरांनी कामावर ठेवू नये. ज्या लोकांनी स्वैराचाराच्या काळात लोकांची लुट केली तितक्यांना पकडून ब्रिटीशांच्या स्वाधिन करावे. ब्रिटीश सरकार किंवा त्यांचे मित्र यांच्या मुलखात सावंतवाडीच्या प्रजेपैकी कोणी लुट केल्यास त्याला इंग्रजांच्या स्वाधिन करावे. सावंतवाडीकरांनी पाट व आजगाव या दोन तर्फा ब्रिटीशांना आणि कर्ली नदीपासून पोर्तुगीजांचा अंमल असलेल्या भागापर्यंत पूर्ण किनारपट्टी आणि रेडी व निवती हे किल्ले कायमचे ब्रिटीशांना द्यावे. ब्रिटीशांना सावंतवाडी संस्थानच्या हद्दीत गुन्हेगारांना शोधण्यास मोकळीक असावी. हा तह झाल्यानंतर सावंतवाडी संस्थानच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन गायडीयन या अधिकाऱ्याला ठेवून मेजर जनरल केर हा परत आपल्या मुख्यालयाकडे गेला.

चंद्रोबा यांना मिळाली १० हजाराची नेमणूक

तटस्थ राहून चंद्रोबा सुभेदार यांनी इंग्रजांना केलेल्या मदतीबद्दल ब्रिटीशांनी त्यांना दरवर्षी १० हजार रूपयांची नेमणूक करून दिली. हे पैसे सावंतवाडी संस्थानकडून द्यावेत असे सांगितले. ती पोच करण्याची हमी ब्रिटीशांनी घेतली. ही नेमणूक मिळाल्यानंतर चंद्रोबा यांनी स्वस्त रहावे. चंद्रोबा आणि त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी बांद्याचा कोट द्यावा असेही ब्रिटीशांनी ठरवले. यानंतर चंद्रोबा सुभेदार काही काळ शांत राहिले. ते आणि त्यांचे कारभारी विठ्ठल नारायण गायतोंडे हे सावंतवाडीकरांना पाहिजे तेव्हा मदत करू लागले.

loading image
go to top