दर्शनासाठी भक्तांची गणपतीपुळ्यात मांदियाळी

राजेश कळंबटे
Monday, 16 November 2020

मंदिर उघडल्यानंतर नवस फेडणाऱ्यांची आणि दर्शन घेण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात गर्दी पहायला मिळत आहे. 

रत्नागिरी : कोरोनातील बंदी उठली आणि मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. गेले सहा महिने श्रींच्या दर्शनासाठी आतुर झालेली भक्त दर्शनासाठी आणि राहिलेले नवस फेडण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे आज सोमवारी  प्रसिद्ध गणपतीपुळे येथे भक्त गणांची गर्दी दिसू लागली आहे. शासनाच्या आदेशानुसार आजपासून मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. मंदिर उघडल्यानंतर नवस फेडणाऱ्यांची आणि दर्शन घेण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात गर्दी पहायला मिळत आहे. 

हेही वाचा -  कोल्हापुरच्या वीर पुत्राला अखेरचा सलाम -

पुणे आणि साताऱ्याच्या वाई इथून छोट्या मुलांना दर्शनासाठी चव्हाण आणि गाडकवाड कुटुंबीय दाखल झाले आहेत. मुलांना गणपतीच्या पायावर घालण्यासाठी सकाळी गणपतीपुळे मंदिरात आले होते. नऊ महिन्याच्या स्वरुप आणि एक वर्षाच्या राजवी ही छोटी बाळं गणरायाच्या दर्शनासाठी आली होती. कोरोना काळात मंदिरातील देवांची दर्शन बंद होती. मंदिरे उघडल्या उघडल्या दर्शन रांगेतून दर्शनाचा योग साधला गेल्याचा आनंद भाविक पूजा गायकवाड यांनी व्यक्त केला. 

आठ महिन्यानंतर देवा चरणी लीन होण्याकरता मिळाल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. गणपतीपुळे येथे देखील भाविक दाखल झाले असून गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आहेत. यावेळी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप काही सांगून जात आहे. 

दिवाळी पाडव्याच्या दिवशी मंदिरं खुली झाल्यानं आजचा दिवस आमच्यासाठी खरा दिवाळी दसरा असल्याची प्रतिक्रिया भाविकानी व्यक्त केली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून भाविक गणपतीपुळे येथे दाखल झाले असून या ठिकाणच्या समुद्र किनारा देखील हळूहळू गजबजताना दिसत आहे. शिवाय, स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला असून निर्णयाबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा - डोंगर उतारावर पिकवली आले शेती ; पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
 

अशी घेतली जातेय काळजी 

गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शनासाठी येणार्‍या भक्तगणांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेण्यास सुरवात केली आहे. मंदिरात दर्शनासाठी झुंबड उडू नये, गर्दी होणार नाही हे लक्षात घेऊन पाच फुटाचे अंतर, मंदिर परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था, हातपाय धुण्यासाठी जागोजागी नळ, मंदिरात येणार्‍या प्रत्येक पर्यटकाचे तापमान आणि ऑक्सीजन तपासणी अशी व्यवस्था केली आहे. मास्क घालण्यासाठी बंधन घातले असून यावर देवस्थानचा कर्मचारी वर्ग जातीनिशी लक्ष ठेवून आहे. तसेच दर्शन घेण्यासाठी आलेल्यांची पदाचा उपयोग करून रांग सोडून दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे. 

"सकाळी 8 ते दुपारी 12 आणि 2 ते संध्याकाळी 7 या कालावधीत श्रींचे दर्शन सुरु राहील. आज सकाळ पासून सुमारे 2 हजार लोकांनी नियम पाळत दर्शन घेतले. दिवसभरात सुमारे 8 ते 10 हजार पर्यटक दर्शन घेतील. शासनाचे नियम पाळून भक्तांनी दर्शन घ्यावे." 

- डॉ.  विवेक भिडे, सरपंच, गणपतीपुळे देवस्थान

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpatipule temple open today for devotees on ganpatipule in ratnagiri