दापोली मतदार संघात गीतेंना मताधिक्य

दापोली मतदार संघात गीतेंना मताधिक्य

दापोलीतील गीतेंचे मताधिक्य कदमांना अडचणीचे

विधानसभेसाठी धोक्याची घंटा; गुहागरमध्येही पिछेहाट
सकाळ वृत्तसेवा ः
दाभोळ, ता. ७ : रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले असले तरीही दापोली विधानसभा मतदार संघामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अनंत गीते यांना ८ हजार ४५२ मतांचे मताधिक्य मिळाले असून, ही बाब महायुतीच्या व विशेषतः शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यादृष्टीने चिंताजनक आहे.
या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मते मिळाली तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली. या निवडणुकीत दापोली विधानसभा मतदार संघातून अनंत गीते यांना सुनील तटकरे यांच्यापेक्षा ८ हजार ४५२ मते अधिक मिळाली. गुहागर मतदार संघातून तब्बल २७ हजार ७९६ मते अधिक मिळाली. सुनील तटकरे यांच्या दापोली विधानसभा मतदार संघात झालेल्या प्रचाराच्या सभेत आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांना मताधिक्य मिळवून देऊ, असे सांगितले होते; मात्र दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघातून गीते यांनाच मताधिक्य मिळाले. दापोली मतदार संघात गेल्या ५ वर्षात आमदार योगेश कदम यांनी प्रत्येक गावात अनेक विकासकामे केली आहेत. संपूर्ण मतदार संघात शिवसेनेची संघटना ही मजबूत आहे. त्यांच्या जोडीला भाजपा व राष्ट्रवादी तसेच आरपीआय व मनसे असे महत्वाचे पक्ष असतानाही अनंत गीते यांना मिळालेले मताधिक्य हे भवितव्याच्यादृष्टीने धोकादायक ठरणार आहे. याउलट अनंत गीते यांचे समर्थक माजी आमदार संजय कदम यांच्याकडे साधनसामुग्रीची वानवा असतानाही तसेच महत्वाचे कार्यकर्ते नसताना त्यांनी संपूर्ण मतदार संघात फिरून ८ हजार ४५२चे मताधिक्य दिले.
दापोली मतदार संघातून फेरी क्र. ३, ६, १०, १२, १४, १६, २४, २५ या ८ फेऱ्यांमध्ये सुनील तटकरे यांना आणि उर्वरित १९ फेऱ्यांमध्ये अनंत गीते यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार कदम यांना विजय मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com