समुद्र, किनाऱ्यावरील अधिकार मच्छीमारांना द्या : पी. एन. चौगुले | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मच्छीमार आज मागणार त्यांचा अधिकार

समुद्र, किनाऱ्यावरील अधिकार मच्छीमारांना द्या : पी. एन. चौगुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णै : मच्छीमारांना समुद्रावरील व किनाऱ्यावरील अधिकार देण्याचा कोस्टल अधिकार कायदा द्या, ही प्रमुख मागणी जागतिक मच्छीमार दिनानिमित्तच्या कार्यक्रमात करणार आहोत, अशी माहिती दापोली मंडणगड-गुहागर मच्छीमार संघर्ष समिती हर्णै बंदरचे अध्यक्ष पी. एन. चौगुले यांनी दिली.

महाराष्ट्रातील मच्छीमार संघटनांचे अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ) महाराष्ट्र मच्छीमार कृति समिती, दापोली-मंडणगड - गुहागर मच्छीमार संघर्ष समिती हर्णै बंदर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २१) जागतिक मच्छीमार दिनानिमित्त हर्णै बंदर येथे महासभा व विविध पारंपरिक कोळी नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मच्छीमारांच्या मूलभूत अधिकाराबद्दल, अधिकारावर आक्रमण करणाऱ्या समस्याबद्दल व व्यवसायावर येणाऱ्या संकटांवर चर्चा करून तसे ठराव करून मागण्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

२१ नोव्हेंबर १९९७ ला राजधानी दिल्ली येथे जगातील राष्ट्रांच्या जागतिक मच्छीमार नेत्यांना एकत्र आणून जागतिक स्तरावर मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आली. म्हणूनच जगभर दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मच्छीमार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या पारंपरिक वेशात नटून थटून, पारंपरिक नाच-गाणी गाऊन आनंदोत्सव साजरा करतात व आपल्या कष्टमय मच्छीमार व्यवसायाचे संस्कृतीचे प्रदर्शन करतात. झालेले कष्ट विसरून पुन्हा नव्या जोमाने कष्ट करण्यासाठी तयार होतात, असे सांगून चौगुले म्हणाले. मासे देणाऱ्या तिवरांच्या झाडांची सार्वजनिक पूजा केली जाते. त्यानंतर मच्छीमारांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला आमदार अशोक पाटील, लिओ कोलासो, नरेंद्र पाटील यांच्यासह मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अशी घेणार शपथ

हे तिवरांच्या झाडा तुमच्याखाली असलेल्या छायेमध्ये मासे अंडी घालतात. तेथे असलेल्या छोट्या छोट्या बिळामध्ये जन्माला आलेले छोटे मासे तिथेच वाढतात. त्यांना तुझी फुले व पाने अन्न म्हणून मिळते व त्यांचे चांगल्याप्रकारे संगोपन होते. त्यांची वाढ झाल्यावर ते समुद्रात जातात. त्यामुळेच आम्ही त्यांना पकडून आमचे जीवन जगतो. हे तिवराच्या झाडा आमच्या १४ पिढ्यांना पुरेल एवढे मासे आम्हाला तू देत रहा. आम्ही तुझी मनोमन पूजा करू व तुझा सांभाळ करू. आम्ही तिवरांच्या झाडाला मुळासकट कधीच कापणार नाही अशी शपथ घेतो. अशाप्रकारची शपथ रविवारी (ता. २१) सायंकाळी ४ वाजता हर्णै बंदर याठिकाणी सर्व मच्छीमार एकत्र येऊन घेणार आहेत.

loading image
go to top