गोव्यातील पर्यटकांची तेरवण मेढेला पसंती

प्रभाकर धुरी
रविवार, 16 जून 2019

दोडामार्ग - गोव्यातील पर्यटकांची तेरवण-मेढेला पसंती आहे. तेथील घनगर्द झाडी, खळाळता पाण्याचा प्रवाह आणि जवळचा निळाशार उन्नेयी बंधारा त्यांना साद घालत असतो. त्यामुळे वीकेंडला येणारा शनिवार आणि रविवार त्यांच्यासाठी "फन डे' असतो. 

दोडामार्ग - गोव्यातील पर्यटकांची तेरवण-मेढेला पसंती आहे. तेथील घनगर्द झाडी, खळाळता पाण्याचा प्रवाह आणि जवळचा निळाशार उन्नेयी बंधारा त्यांना साद घालत असतो. त्यामुळे वीकेंडला येणारा शनिवार आणि रविवार त्यांच्यासाठी "फन डे' असतो. 

तिलारी धरण आणि परिसर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिलारी धरणाच्या एका बाजूला तेरवण मेढेचा उन्नेयी बंधारा आहे. मनमोहक बंधाऱ्याजवळ भारतातील सर्वात छोटा जलविद्युत प्रकल्प आहे. जवळच वनसंशोधन केंद्रही आहे. बंधाऱ्याचे पाणी कातळावरून खळाळत जाते तेव्हा वाहत्या पाण्याचा नाद वेडावणारा आणि पाण्यात डुंबण्याची इच्छा जागृत करणारा असतो. शिवाय नदीकाठी वन विभागाने उभे केलेले टेहेळणी बुरूज आणि गझिबोही आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. नदीकाठावर असलेले भलेमोठे आणि दाहीदिशांना विस्तारलेले आंब्याचे झाड आणि अन्य झाडांची दिवसभर असणारी सावली पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणारा असते. अनेक पर्यटक न चुकता वर्षानुवर्षे तिथे पर्यटनासाठी येतात. 

निसर्गाच्या सानिध्यात वीकेंड साजरा करण्यासाठी येणारे बरेचसे पर्यटक पर्यावरणाबाबत संवेदनक्षम आहेत. अजून तरी ते पर्यावरण जतन करू पाहत आहेत, हे म्हापसा बस्तोडा गोवा येथून आलेल्या पर्यटकांच्या बोलण्यातून जाणवले. प्रत्येकाने तसाच विचार करून तिलारी परिसरातील निसर्ग आणि पर्यावरण जतन करण्याची गरज आहे. कानठळ्या बसवणारा गाण्यांचा आवाज, अचकट विचकट नृत्ये, दारू पिऊन धिंगाणा घालणारी तरुणाई या गोष्टी तिलारीत नकोच आहेत. परिसरात असणारे पशुपक्षी, वन्यप्राणी यांचा सतत वावर त्या जंगलमय भागात असतो. त्यांना त्रास न करता आनंद उपभोगणारे पर्यटक तिथे यायला हवेत तरच तिथला निसर्ग आणि जैववैविध्य कायम राहणार आहे. 

अनेक वर्षांपासून तेरवण मेढेत येतो. इथला बंधारा, निळाशार डोह, हिरवीगार झाडे, दिवसभर असणारी सावली, झुळझुळ वाहणारी नदी नेहमी खुणावत राहते. आज जवळपास 70 ते 80 जण आलोत. येथे दारू पिऊन कुणी दंगामस्ती करू नये, तर सर्वांनी इथला निसर्ग जपावा. 
- राजू तलवार,
बस्तोडा, म्हापसा-गोवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa tourist visit Tervan Medhe