शिक्षकांना दिलासा ; रत्नागिरीत अतिरिक्‍त शिक्षकांची नियुक्‍ती होणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून पावले उचलली आहेत.

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील विविध समस्यांबाबत दोन आठवड्यापूर्वी अध्यक्ष रोहन बने यांनी केलेल्या मंत्रालयातील वारीचे फळ लवकरच पदरात पडणार आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून पावले उचलली आहेत. पोर्टलद्वारे भरतीअतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रत्नागिरी जिल्ह्यात रिक्‍त पदांवर नियुक्‍त्या दिल्या जाणार आहेत.

अध्यक्ष रोहन बने यांनी ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यासाठी त्यांनी दोनवेळा मंत्रालयाची वारी केली होती. शिक्षण विभागात शिक्षकांची असलेली रिक्त पदे भरावीत, यासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे घातले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. त्या वेळी शिक्षण सभापती सुनील मोरेही उपस्थित होते.

हेही वाचा - विनामास्क पर्यटकांना मालवणात दंड

मुंबई, ठाणे, पालघरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रत्नागिरी जिल्ह्यात करण्याबाबत पावले उचलली आहेत. तशा सूचनाही दिल्या आहेत. जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, ते इच्छुक असल्यास त्वरित अर्ज सादर करावा, असे पत्र शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी काढले. 

शिक्षण विभागाला दिलासा

शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो. कामकाज चालवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामध्ये ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शिक्षण विभागाला दिलासा मिळाला आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for teachers in ratnagiri the additional post of teachers are recruitment in ratnagiri